प्रकल्पांना गती द्या! पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचे निर्देश

प्रकल्पांना गती द्या! पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचे निर्देश

पुणे : आज दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे यांनी प्रकल्प विभागाच्या विविध सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान मुख्य अभियंता (प्रकल्प) श्री. दिनकर गोजारे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या भेटीची सुरुवात साधू वासवानी पूल येथून करण्यात आली. त्यानंतर आगा खान नदी पूल काम, शास्त्रीनगर उड्डाणपूल व अंडरपास, विश्रांतवाडी उड्डाणपूल व अंडरपास तसेच बिंदू माधव ठाकरे चौक उड्डाणपूल या महत्त्वाच्या प्रकल्पांची पाहणी करण्यात आली.

मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) यांनी प्रत्येक प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाची सद्यस्थिती, प्रगती, अडचणी (हर्डल्स) तसेच पुढील कामाचे नियोजन याबाबत माहिती घेण्यात आली. कामांमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत त्यांनी गांभीर्याने नोंद घेत संबंधित कंत्राटदारांना निर्धारित वेळापत्रकानुसार कामे पूर्ण करण्याचे सक्त निर्देश दिले.

प्रकल्पांची गती वाढवून कामे लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच प्रत्येक प्रकल्पासाठी सविस्तर बार चार्ट (Bar Chart) तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्याचे सूक्ष्म परीक्षण अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावर करण्यात येणार आहे.

यापुढे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दर महिन्याला नियमित बैठका घेण्यात येणार असून, एक बैठक कार्यालयात तर दुसरी प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी घेण्यात येईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागामार्फत शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवले जात असून, हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.