महिला दिनानिमित्त सक्षमा प्रकल्पांच्या महिलांसाठी आज मेळावा; पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाने केले आयोजन...

महिला दिनानिमित्त सक्षमा प्रकल्पांच्या महिलांसाठी आज मेळावा; पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाने केले आयोजन...
पिंपरी :-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग सक्षमा प्रकल्पांर्गत महिला दिनानिमित्त महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन बुधवार दि.५ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. पिंपरी कॉलनी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाजवळील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे होणाऱ्या  या मेळाव्यात सक्षमा प्रकल्पातील महिलांना सहभागी होता येणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले  आहे.
 
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे या मेळाव्यामध्ये  स्वयं सहाय्यता बचत गटांना मार्गदर्शन करणार आहेत. तर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील हे ‘स्वयं सहाय्यता बचत गट पुढील वाटचाल’ या विषयावर आणि समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे हे  पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या विविध महिला योजनांची माहिती देणार आहेत.
 
याशिवाय महिलासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात विविध सांस्कृतिक व मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये टाटा स्ट्राईव्हच्या फिल्ड समन्वयक निशा निमसे व त्यांचे सहकारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करतील. त्यानंतर टाटा स्ट्राईव्हच्या अजिता कर्वे या ‘सक्षमा प्रकल्प माहिती व साध्य’ या विषयावर, टाटा मोटर्स गृहिणी विभागाच्या अध्यक्षा शिल्पा देसाई ‘व्यवसायवृद्धी व मार्केट लिंकेज’ विषयावर, टाटा स्ट्राईव्हच्या सल्लागार अनिता राजन या ‘महिला सक्षमीकरण’ विषयावर, टाटा स्ट्राईव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय वंजारी हे ‘घे भरारी’ विषयावर, टाटा ऑटोकॉम इंटेरिअर आणि प्लास्टिक डिझाईनच्या एचआर हेड स्मिता जाधव या ‘महिला एकत्रीकरण’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी यशस्वी महिलांचा सत्कार समारंभ, यशस्वी महिलांचे मनोगत, टाटा गृहिणींची यशस्वी गाथा असे विविध कार्यक्रम देखील होतील.
 
बचत गटांना सक्षम करणारा प्रकल्प
 
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हस ट्रस्ट (टाटा स्ट्राइव्ह) या संस्थामध्ये 2023 मध्ये महिला स्वयंसहाय्यता गटाचे सक्षमीकरण करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. सदर करारामध्ये पुढील 5 वर्षामध्ये  5000 स्वयंसहायता महिला गटांना  (Self Help Group-SHG) सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये स्वयंसहायता महिला बचत गटांना “सक्षम” करणे हे महत्वाचे उद्दिष्ट असून यामध्ये बचत गटाचे सर्वेक्षण करणे, क्षमता बांधणी करणे, गटाचे पायाभूत सभासद प्रशिक्षण, आर्थिक साक्षरता, उद्योजकता विकास व नेतृत्व विकास यासारख्या आदी विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले आहे.
 
राज्य शासनाच्या वतीने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना राबविण्यात येत आहे. महिलांच्या रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक, पुर्नवसन करणे, त्यांना आत्मनिर्भर स्वावलंबी बनवणे तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेविषयी माहिती देखील या मेळाव्यात देण्यात येणार आहे.
 
सक्षमा प्रकल्पांतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील महिला बचत गटांच्या आर्थिक आत्मनिर्भरतेसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. महिला दिनानिमित्त आता सक्षमा प्रकल्पातील महिलांसाठी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात सक्षमा प्रकल्पांतर्गत महिलांनी बनवलेल्या उत्पादनाचे प्रदर्शन देखील असणार आहे. हा मेळावा या महिलांच्या यशाचा उत्सव साजरा करणारा ठरेल.
 
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका