रक्तदानातून गरजूंना जीवदान

रक्तदानातून गरजूंना जीवदान
रक्तदानातून गरजूंना जीवदान
रक्तदानातून गरजूंना जीवदान
रक्तदानातून गरजूंना जीवदान

पुणे, दि. २० : रक्तदान हे श्रेष्ठ दान असून एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे किमान तीन गरजू रुग्णांना मदत होऊ शकते. रक्तदानामुळे रुग्णांना जीवदान मिळण्यासोबतच रक्तदात्याच्या आरोग्यालाही काही फायदे होतात. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन ब्लड बँकेच्या डॉ. विद्या राठोड यांनी केले.

माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने श्री अष्टविनायक मित्र मंडळ, माजी सैनिक नगर, येरवडा येथे आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात डॉ. राठोड यांनी रक्तदानाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यविषयक फायदे याबाबत मार्गदर्शन केले.

नियमित रक्तदानामुळे शरीरातील अतिरिक्त लोहाचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. रक्तदानानंतर शरीर नवीन लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी कार्यरत होते. त्यामुळे अस्थिमज्जेला उत्तेजना मिळून नवीन रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते, अशी माहिती डॉ. राठोड यांनी दिली.

रक्तदानापूर्वी दात्याची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये हिमोग्लोबिन, रक्तदाब, नाडीचा वेग आणि वजन तपासले जाते. तसेच रक्ताची एचआयव्ही, हिपॅटायटीस आणि मलेरिया यांसारख्या आजारांसाठी तपासणी केली जाते.

रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन डॉ. राठोड यांनी केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष ओमकार ढाणे, उपाध्यक्ष ओमकार नायर, कार्याध्यक्ष पियुष गायचोर, मंडळाचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.