स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत पुढील सुनावणी ६ मे ला होणार....

सर्वोच्च न्यायालयातील याचिकाकर्ते विलास मडिगेरी यांची माहिती
पिंपरी :-राज्यातील 2021 व 2022 पासून रखडलेल्या महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक निकालासाठी आज, दि. 4 मार्च 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. यामध्ये झालेल्या युक्तीवादानंतर पुढील सुनावणी 6 मे 2025 ला होणार आहे, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयातील याचिकाकर्ते विलास मडिगेरी यांनी दिली आहे.
निवडणुकीबाबतची सुनावणी आज मंगळवार 4 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात झाली. ही याचिका दहाव्या क्रमांकावर होती. न्यायालयांच्या सुनावणी होवून निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवडसह 23 महापालिका वर प्रशासकीय राजवट आहे. तसेच 23 याचिकाकर्त्यांचे वकील त्यामध्ये आमचेही वकील अॅड. श्रीरंग वर्मासह आणि सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद केला.
सुप्रीम कोर्टात थोड्या काळासाठी सुनावणी झाली, निवडणुका तर दोन्ही बाजूंना हव्या आहेत. पण ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाचा प्रश्न संपला आहे की नाही? निवडणुका जुन्या प्रभाग पद्धतीने की नव्या.. यावर सरकारी पक्ष आणि 23 याचिकाकर्ते यांच्यात मतभेद मा. न्यायमूर्तीसमोर झाले. मुद्दा काय आहे, हे नीट समजून देता आलेले नाही. त्यामुळे आता प्रकरण कोर्टाने पुढे ढकलले.. यावरून आम्हास वाटते की आत्ता 2025 मध्ये निवडणुका होणे अशक्य दिसते.
न्यायालयाने 6 मे 2025 ला पुढची तारीख दिली आहे. या याचिकेबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी यांचे वकील श्रीरंग वर्मा यांनी ही माहिती दिली असल्याचे याचिकाकर्ते विलास मडिगेरी यांनी सांगितले.