ठाणे, (प्रतिनिधी) ता. ८ फेब्रुवारी २०२५
कुठल्याही शुभप्रसंगी सुरेश वाडकरांचे ओमकार स्वरूपा ऐकू येते, ते नावाप्रमाणेच सुरांचे देव आहेत. रिमिक्स, फ्युजनच्या जमान्यात सुरेश वाडकरांचा आवाज नंदादिपासारखा वाटतो. सुरेश वाडकर हे संगीताचा अभिजात मराठी सूर आहे, असे कौतुकोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. आनंदोत्सव संगीत समारोहात शिंदे यांच्या हस्ते वाडकर यांचा स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
शिंदे पुढे म्हणाले की, धर्मवीर आनंद दिघें यांच्या नावाने सुरू झालेला हा आनंद उत्सव आहे. स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानचा पहिला जीवन गौरव पद्मश्री सुरेश वाडकर यांना दिला, त्यांचा गौरव करण्याची संधी माझ्यासारख्या धर्मवीरांच्या कार्यकर्त्याला मिळाली हे माझ भाग्य समजतो. सुरेशजींनी हा पुरस्कार स्वीकारल्याने या पुरस्काराचा गौरव वाढला आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ओमकार प्रभूघाटे आणि निधी प्रभू या पुरस्कारप्राप्त युवा कलाकरांचेही शिंदे यांनी यावेळी अभिनंदन केले.
ते पुढे म्हणाले की, सुरेश वाडकरांची तीन दिवसांपूर्वी एन्जोग्राफी झाली मात्र तरिही आनंद दिघेंशी, ठाणेकरांशी आणि माझ्याशी त्यांचे जिव्हाळ्याचं नातं असल्यानेच ते या सोहळ्याला उपस्थित राहिले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्यांच्या उपस्थितीमुळे आनंद उत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला. दीड वर्षापूर्वी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सुरेशजींना प्रदान करण्याची संधी मला मुख्यमंत्री म्हणून मिळाली होती, त्यावेळी लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर पण मी कॉमन मॅन म्हणून काम केले आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम करतोय. सर्वसामान्य माणूस ते जपला पाहिजे, अशी मत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.
सुरेशजींबद्दल जेवढे बोलावं तेवढं कमी आहे. त्यांनी गायलेलं ए जिंदगी गले लगा ले, हे गाणं आजही प्रत्येकाच्या कानामध्ये आहे. आमच्यासारखे अनेक तरुणांचा संघर्षाचा काळ होता. हे गाणं आमच्यासारख्या अनेकांना उमेद देऊन गेलं, प्रेरणा देऊन गेलं, ऊर्जा देऊन गेलं, असे ते म्हणाले. वाडकरांनी पार्श्वगायनात किर्ती मिळवली पण त्यांनी संगीताचे व्रत कधीच सोडले नाही. हा त्यांचा मोठेपणा आहे.हिंदीचा वारा लागू न देता ते अस्सल कोल्हापुरीच राहिले असे ते म्हणाले.
वाडकर यांना आजवर अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवले. पद्म पुरस्काराचे ते मानकरी ठरले, हा जीवनगौरव ही ठाणेकरांनी सुरेशजींबद्दल व्यक्त केलेली ही निर्मळ कृतज्ञता आहे, असे गौरवौद्गार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काढले. असेच प्रेम ठाणेकरांवर कायम आपल्या असू द्या, कुठेही गेलो तरी ठाणेकरांना मला विसरता येत नाही. या ठाण्याने मला भरभरून प्रेम दिले, ठाणेकरांमुळे शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार आणि या राज्याच्या मुख्यमंत्री झालो, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. या सोहळ्याला मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, संजय मोरे आदी उपस्थित होते.