स्वेरीत ‘सीट्स २०२५’ या राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर (ऑटोनॉमस) मध्ये सस्टेनेबल एनर्जी अँड ईफीसीएंट थर्मल सिस्टीम अर्थात ‘सीट्स २०२५’ या राष्ट्रीय परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला विद्यार्थी व प्राध्यापकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाने ‘अॅश्रे पुणे चॅप्टर’ च्या सहकार्याने ‘सस्टेनेबल एनर्जी अँड ईफीसीएंट थर्मल सिस्टीम’ अर्थात ‘सीट्स २०२५’ ही राष्ट्रीय परिषद दि.१७ एप्रिल २०२५ रोजी आयोजित केली होती. ऊर्जासंवर्धन, ऊर्जा कार्यक्षम प्रणाली आणि थर्मल अभियांत्रिकी क्षेत्रात नवनवीन संशोधन व ज्ञानाच्या देवाण-घेवाणीला चालना देण्यासाठी ही परिषद आयोजित केली होती. या परिषदेच्या उदघाटन समारंभानंतर विविध मान्यवरांचे मार्गदर्शन, तांत्रिक सादरीकरणे आणि विद्यार्थ्यांसह अभ्यासकांचे मार्गदर्शन संवाद झाले. यामध्ये देशभरातील विविध अभियांत्रिकी शाखांमधील पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. च्या सहभागी विद्यार्थ्यांनी आपले संशोधन लेख सादर केले. या कार्यक्रमाला ‘अॅश्रे पुणे चॅप्टर’ चे प्रमुख सदस्य उपस्थित होते. ‘अॅश्रे पुणे चॅप्टर’चे प्रेसिडेंट अमित पायगुडे म्हणाले की, ‘ या परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील शाश्वत एचव्हीएसी पद्धती बद्दलचा उत्साह दिसून आला. सादरीकरणाची गुणवत्ता आणि उर्जा कार्यक्षमतेच्या प्रकारासाठी स्वेरीचे नियमित होत असलेले प्रयत्न पाहून मी खूप प्रभावित झालो आहे.’ ‘अॅश्रे पुणे चॅप्टर’ पुण्याचे अक्षय पहाडे व चॅप्टर टेक्नोलोजी ट्रान्सफर कमिटीचे अंकित शेंगडीया यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन सत्रे घेतली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत जागतिक एचव्हीएसी प्रणाली, ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान आणि थर्मल अभियांत्रिकीतील शाश्वततेबाबत मौल्यवान माहिती दिली. अखेरीस ट्रेझरर आणि विद्यार्थी उपक्रमाचे प्रमुख तेजस बागुल म्हणाले की, ‘स्वेरीच्या अॅश्रे विद्यार्थी शाखेचा सक्रीय सहभाग खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांची एचव्हीएसी शिक्षणासाठी असलेली बांधिलकी अॅश्रेच्या विविध विद्यार्थी केंद्रित दृष्टीकोनाशी पूर्णपणे जुळणारी आहे.’ ‘अॅश्रे स्वेरी विद्यार्थी’ शाखेचे सल्लागार आणि आयोजन समितीचे सचिव डॉ. दिग्विजय दादासाहेब रोंगे यांनी स्वेरी ‘अॅश्रे स्टुडंट ब्रांच’ च्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली. या शाखेची स्थापना २०२१ मध्ये झाली असून यामध्ये सध्या २२ विद्यार्थी सदस्य आणि २ प्राध्यापक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. या शाखेला २०२२ मध्ये ‘अॅश्रे अंडर ग्रॅज्युएट प्रोजेक्ट ग्रँट’ अंतर्गत ३००० हजार डॉलर निधी मिळाला आहे. विद्यार्थ्यांनी स्टेम अॅक्टिव्हिटीज, डिझाईन स्पर्धा आणि विविध कार्यक्रमांत सहभाग घेतला आहे. ‘अॅश्रे’ द्वारे दोन कंपन्यांनी कॅंपसमध्ये प्लेसमेंटसाठी भेट दिली आणि विद्यार्थ्यांची निवड केली. संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए.पी. केने, विभागप्रमुख डॉ. एस. बी. भोसले, यांच्यासह इतर प्राध्यापकांनी कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी एकूण ४५ लेख प्राप्त झाले असून उत्कृष्ट लेखांसाठी प्रथम पारितोषिक म्हणून रु. १५०० व द्वितीय पारितोषक म्हणून रु. १००० असे वितरीत करण्यात आले. यावेळी सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. ‘सीट्स २०२५’परिषदेच्या यशस्वी आयोजनामुळे शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील सहकार्याला नवी ओळख मिळाली असून स्वेरी आणि ‘अॅश्रे पुणे चॅप्टर’ यांच्या शाश्वत अभियांत्रिकी उपाययोजनांप्रती असलेल्या कटीबद्धतेला चालना मिळाली आहे हे मात्र नक्की.