अपंगांच्या हक्कांसाठी जळगाव महापालिकेवर 'विश्वरत्न अपंग बहुउद्देशीय संस्थे'चा मोर्चा

अपंगांच्या हक्कांसाठी जळगाव महापालिकेवर 'विश्वरत्न अपंग बहुउद्देशीय संस्थे'चा मोर्चा
जळगाव : जळगाव शहरातील अपंग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विश्वरत्न अपंग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक बाविस्कर व छावा मराठा युवा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहर महानगर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. महापालिकेच्या इमारतीत अपंग बांधवांना पोहोचणे अवघड असल्याने अमोल कोल्हे यांनी थेट आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याशी संपर्क साधून निवेदन स्विकारण्यासाठी खाली यावे, अशी विनंती केली. आयुक्त बैठकीमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी उपायुक्त निर्मला गायकवाड यांना मोर्चातील प्रतिनिधींची भेट घेण्यासाठी पाठवले. उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करून त्यांच्या भावना जाणून घेतल्या व निवेदन स्वीकारले. तसेच त्यांच्या समस्या निश्चितपणे लवकरात लवकर सोडवण्यात येतील व त्यांना महानगरपालिकेतर्फे परिपूर्ण सहकार्य करण्यात येईल असे आश्वस्त केले. 

                  

  निवेदनात नमूद केले आहे की, दिव्यांग नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान घरकुल आवास योजना, नरेंद्र मोदी आवास योजना यासह विविध योजनांचा जळगाव महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग, विधवा, निराधार, दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना लाभ मिळावा यासाठी महानगरपालिकेने त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात. दिव्यांग बांधव जळगाव शहरातील रहिवासी असून त्यांच्यापैकी बहुतांश व्यक्ती या सर्व योजनांपासून वंचित राहिलेले आहेत. बहुतांश दिव्यांग बांधव मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवितात परंतु तुटकुंजा उत्पन्नामुळे त्यांना अद्यापही स्वतःचे घर घेता आलेले नाही. शासकीय योजनांचा लाभ मिळाला तर त्यांना स्वावलंबनाने स्वाभिमानाने जीवन जगता येईल व स्वतःच्या घरात राहता येईल. दिव्यांगांच्या लाभासाठी असलेल्या शासन निर्णयांची त्वरित अंमलबजावणी करून घरकुल योजना व विविध शासकीय योजनांचा लाभ गोरगरीब दिव्यांग निराधार व्यक्तींना मिळावा. तसेच त्यांना 35 किलो धान्य मिळावे, लाईट बिल व घरपट्टी माफ करण्यात यावी. सदर निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या वेळेत पूर्ण न झाल्यास दिव्यांग बांधवांतर्फे तीव्र स्वरूपाची आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ सकारात्मक पावले उचलून अपंग बांधवांच्या न्याय्य हक्कांचा विचार करावा. उपायुक्तांशी चर्चेदरम्यान आंदोलकांनी सांगितले की, शासनाने त्यांना दिलेले मासिक मानधन देखील त्यांना वेळेवर मिळावे आणि अपंग नसूनही सदरचे मानधन घेणाऱ्या बोगस, खोट्या लाभार्थ्यांचे मानधन तात्काळ बंद करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आमच्या मागण्या वेळेत पूर्ण न झाल्यास दिव्यांग बांधवांतर्फे तीव्र स्वरूपाची आंदोलन करण्यात येईल. 
 
     या आंदोलनात सुनंदाबाई कोळी, वैशाली ठाकूर, आशाताई अंभोरे, सागर बाविस्कर, नंदा जोशी, नितीन लढ्ढा, योगेश गवळी, संगीताबाई, दीपक गवळी, कमल पाठक यांच्यासह दिव्यांग बांधव व भगिनींनी सहभाग घेतला.