कारगिल युद्धातील परमवीर चक्र विजेते कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी घेतले 'दगडूशेठ' गणपतीचे दर्शन

कारगिल युद्धातील परमवीर चक्र विजेते कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी घेतले 'दगडूशेठ' गणपतीचे दर्शन
पुणे : कारगिल युद्धात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल सर्वोच्च अशा परमवीर चक्र सन्मानाने  गौरविण्यात आलेले कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. मंदिरात त्यांच्या हस्ते गणरायाची आरती देखील झाली. 

 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने परमवीर चक्र विजेते कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांचे स्वागत व यशोचित सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, मंगेश सूर्यवंशी, रोहित लोंढे, यांसह संजय भोसले, किशोर येनपुरे आदी उपस्थित होते. 

 
कॅप्टन योगेंद्र सिंह यादव म्हणाले, 'दगडूशेठ' हे असे गणपती बाप्पा आहेत, जे भक्ताच्या नावाने ओळखले जातात. देवतांमध्ये गणेशाचे स्थान सर्वोच्च असून करुणा, रिद्धी, सिद्धी, ज्ञानाचे ते प्रतीक आहेत. वेगळ्या प्रकारची शांती दगडूशेठ मंदिरात मिळते. गणपती बाप्पाने जे ज्ञान दिले आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविता येईल, असा माझा प्रयत्न आहे. पर्यावरणासह मानवतेला नवी चेतना देणारा दगडूशेठ गणपती ट्रस्ट आहे. भारतवासीयांवर गणेशाची कृपा सदैव राहो आणि सर्वत्र सुख शांती नांदो, अशी प्रार्थना त्यांनी गणेश चरणी केली.