पिंपरी :-निगडी येथील त्रिवेणीनगरमार्गे नाशिक महामार्ग तसेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या मिसिंग लिंकचे काम पुर्णत्वावर आले असून तात्पुरत्या स्वरूपात हा रस्ता नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयाकडील विशेष भूसंपादन विभागाने १५ फेब्रुवारी रोजी संबंधित जागेचा ताबा हस्तांतरित केल्यानंतर उर्वरित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले.
सध्या या प्रकल्पाचे ८० टक्के काम पुर्ण झाले असून एकूण ४५० मीटर लांबीचा रस्ता विकसित करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन अशा एकूण सहा लेनचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय, उर्वरित अनुषंगिक कामे जलद गतीने सुरू असून लवकरच पूर्ण क्षमतेने रस्ता सुरू करण्यात येणार आहे.
प्रकल्पाची माहिती:
मंजूर विकास आराखड्यानुसार हा रस्ता ७५ मीटर रुंद
सध्या ३७ मीटर रुंद रस्ता विकसित करणेत आला आहे.
दोन्ही बाजूस १२ मीटर रुंद (तीन लेन), मध्यभागी ९ मीटर रुंदीचा उच्च क्षमतेचा मास ट्रान्झिट रूट आणि दोन्ही बाजूंनी २ मीटर रुंदीचे पेव्ह शोल्डर आहेत.
पहिल्या टप्प्यामध्ये दुहेरी मार्गाच्या २७० मीटर लांबीच्या भागाचे डांबरीकरणाचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले होते.
एकूण ५५० मीटर लांबी असलेल्या या रस्त्यातील मंजूर विकास आराखड्यातील ४५० मीटर रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे.
प्रकल्पामुळे नागरिकांना होणारे फायदे..
या प्रकल्पामुळे निगडी येथील भक्ती शक्ती चौकातून पुणे–नाशिक आणि जुन्या मुंबई–पुणे महामार्गाशी होणारे दळणवळण सुधारण्यास मदत होईल.
मुख्य रस्त्यांवरील अवजड वाहनांची वाहतूक कमी होण्यामुळे पर्यावरणपूरक वातावरण टिकवण्यात आणि प्रवाशांच्या वेळ व इंधन बचतीस मदत होईल.
हा रस्ता तळवडे संगणकीय औद्योगिक केंद्र मार्गे चाकण एमआयडीसीला जोडण्यात महत्वाचा दुवा म्हणून काम करणार आहे.
अत्याधुनिक तांत्रिक पद्धतीने रस्ता विकसित केल्यामुळे जलनिसारण संबंधी समस्या कमी होतील आणि अपघाताच्या घटनांमध्ये देखील घट होणार आहे.
त्रिवेणीनगर मार्गे नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. नागरिकांच्या वाहतूक सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपात हा रस्ता खुला करण्यात आला आहे. उर्वरित अनुषंगिक कामे जलद गतीने सुरू असून, लवकरच हा रस्ता पूर्ण क्षमतेने वापरासाठी उपलब्ध होईल. मुख्य मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करून प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाचवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. तसेच, औद्योगिक आणि व्यावसायिक दळणवळणासाठी हा रस्ता एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.