शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी कसा घ्यावा याविषयी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी. आ. अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य

शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी कसा घ्यावा याविषयी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी. आ. अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य
        सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.28, पशुपालनात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर मूल्यसाखळी विकसित होऊन चांगली बाजारपेठ मिळवणे शक्य असून, यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते असे मत व्यक्त करीत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह शेतीपूरक व्यवसायाचा अवलंब करावा असे प्रतिपादन आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
 
शेळी, कुकुट पालन, दुधाळ जनावरे याप्रकारचे पशुधन हे शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचे साधन आहे असे स्पष्ट करीत शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण होण्यासाठी पशु प्रदर्शन मार्गदर्शक ठरेल असा विश्वास देखील आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
 
 बनकीन्होळा ता. सिल्लोड येथे पशुसंवर्धन विभाग ,जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व पंचायत समिती सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित संकरित व देशी जनावरांच्या तालुकास्तरीय पशु प्रदर्शनाचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. अब्दुल सत्तार बोलत होते. 
 
            याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे सभापती केशवराव पा. तायडे, माजी जि. प. अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथ्रीकर, कृउबा समितीचे संचालक नंदकिशोर सहारे, सतीश ताठे, राजेंद्र ठोंबरे, शिवसेना तालुकाप्रमुख मारोती पा. वराडे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. किसन चामरगोरे, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. विजय फुन्से, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, डॉ.बी.बी. गायकवाड, बनकीन्होळा गावच्या सरपंच पद्माबाई फरकाडे , उपसरपंच पूजा खरात , माजी उपसरपंच सोनू जैस्वाल, गुरुदत्त दूध डेअरीचे चेअरमन कचरू फरकाडे, माजी सरपंच रावसाहेब फरकाडे, प्रल्हाद फरकाडे, अब्दुल चाऊस आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 
    पुढे बोलत असताना आ. अब्दुल सत्तार म्हणाले की, तालुक्यात तालुका दूध संघाची स्थापना केली. या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व त्यावर सबसिडी देवून गाईंचे वाटप करण्याचे नियोजन केल्या जात आहे. अशा प्रकारची योजना शासनाने राबवावी यासाठी देखील शासनाला विनंती केली आहे. पशु संवर्धन करीत असतांना पाण्याचे देखील नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी तालुक्यात सिंचन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात येत आहे. पशुसंवर्धनासाठी शासनाच्या विविध योजना आहे याचा लाभ शेतकरी / पशु पालकांनी घ्यावा,शासनाच्या विविध योजना व त्याचा लाभ शेतकऱ्यांनी  कसा घ्यायचा याबद्दलची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना द्यावी असे आ. अब्दुल सत्तार म्हणाले.
---------------
फिरते पशुवैद्यकीय पथकाचे ( मोबाईल व्हॅन ) लोकार्पण
 
दरम्यान या प्रदर्शनात आ. अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याने मंजूर फिरते पशु वैद्यकीय पथक ( मोबाईल व्हॅन ) चे लोकार्पण आ. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. जनावरांना गंभीर व अतिगंभीर आजारासाठी ही व्हॅन पशु पालकांना घरपोच मोफत सेवा देणार आहे. यासाठी सिल्लोड तालुक्यातील पशु पालकांनी '1962'  या टोल फ्री नंबर वर  संपर्क साधावा असे आवाहन पशु संवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 
या प्रदर्शनात विविध ठिकाणच्या जवळपास 300 पशु पालकांनी सहभाग नोंदविला. विविध जातीच्या जनावरांचे एकूण 9 गट तयार करण्यात आले होते. यातील प्रत्येक गटात गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात आले त्याअनुषंगाने एकूण 27 पशु पालकांना आ. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
यावेळी आ. अब्दुल सत्तार व मान्यवरांनी प्रदर्शनात दाखल विविध जनावरांची पाहणी करून आलेल्या पशु पालकांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी.बी. गायकवाड यांनी केले. प्रस्तावित पशुधन विकास अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी तर शेवटी डॉ. एस.बी. मठवाला यांनी उपस्थितांचे आभार मानले.