भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची माहिती
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती निमित्त महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीतर्फे ८ ते १५नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीत नागपूरमध्ये भव्य जनजाती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी गुरुवारी दिली. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने जनजाती समाजाच्या विकासासाठी केलेले कार्य आणि आखलेल्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात येणार आहे, असेही श्री. चौधरी यांनी नमूद केले.
यावेळी श्री. चौधरी म्हणाले की, 15 नोव्हेंबर 1875 ला झारखंडच्या छोट्या गावात जन्मलेले भगवान बिरसा मुंडा यांनी ‘जल, जमीन आणि जंगल’ चे संवर्धन करून आदिवासी समाजाला संघटित करण्याचे मोलाचे कार्य केले. मुंडा यांच्या या कार्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे देशभरात जनजातीय गौरव वर्ष साजरे करण्यात येत आहे. आदिवासी समाजाची दिशाभूल करून त्या समाजातील अनेकांचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्ती मिशन-यांचा डाव त्या काळात बिरसा मुंडा यांनी उधळून लावला होता. जुलमी इंग्रजी राजवटीविरोधात आवाज बुलंद करत कडवा संघर्ष करत देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरोधत बिरसा मुंडा यांनी लढा पुकारला होता. त्यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधत त्यांचे कार्य सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बिरसा मुंडा यांचा काँग्रेसने लपवून ठेवलेला इतिहास या निमित्ताने सर्वांसमोर मांडण्याचा विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष विविध कार्यक्रमांची माहिती पत्रकार परिषदांमधून देतील. 2 नोव्हेंबरपर्यंत प्रदेश कार्यशाळा, 5 नोव्हेंबरपर्यंत विभागीय कार्यशाळा तसेच 7 नोव्हेंबरपर्यंत जिल्हा कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. प्रत्येक मंडल स्तरावर वनवासी कल्याण आश्रम, आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या विविध संघटनांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात येतील. 8 ते 15 नोव्हेंबर दरम्यान निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धांचे राज्यभर आयोजन करण्यात येणार आहे. विविध महाविद्यालये, आदिवासी आश्रम शाळांमध्ये युवा संमेलने होणार आहेत. सन्मान मेळाव्यांमधून जनजाती समाताजील विचारवंत, लेखक, साहित्यिक, उद्योगपती, डॉक्टर, वकील यासह अनेक मान्यवरांना त्यांच्या आदिवासी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे, असेही श्री. चौधरी यांनी सांगितले.