राष्ट्रीय भूमापन दिन उत्साहात संपन्न!

राष्ट्रीय भूमापन दिन उत्साहात संपन्न!

 ठाणे,दि.10(जिमाका): नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज १० एप्रिल रोजी राष्ट्रीय भूमापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी, १० एप्रिल १८०२ रोजी भारतात भूमापनाच्या पहिल्या आधाररेषेची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि ‘ग्रेट ट्रिग्नोमेट्रिक सर्वे’ची सुरुवात झाली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ देशभरात हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून ओळखला जातो.


      कार्यक्रमाची सुरुवात भारतीय पोलीस सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी श्री. सुरिंदर सिंग यांच्या शुभहस्ते आणि भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक श्री.महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलन आणि मोजणी साहित्याच्या पूजनाने झाली.    
       याप्रसंगी व्यावसायिक श्री. संदीप बिंद्रा आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री. बाबासाहेब रेडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
       भूमापन दिनाच्या या विशेष सोहळ्याचे औचित्य साधून, भूमी अभिलेख खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी आणि मागील वर्षी उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
       यावेळी मार्गदर्शन करताना श्री. सुरिंदर सिंग यांनी भूमी अभिलेख खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘नमक, नाम आणि निशाण’ यांच्याशी निष्ठा राखत सेवा करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात श्री. महेश इंगळे यांनी भूमी अभिलेख खात्यातील सकारात्मक बदलांना प्रतिसाद देत अधिकाधिक जनसामान्याभिमुख सेवा देण्यावर भर दिला. विभागाच्या सर्व ऑनलाईन सुविधा जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यांची कामे त्वरित कशी पूर्ण करता येतील याकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.
     कार्यक्रमात श्री. बाबासाहेब रेडेकर आणि श्री. संदीप बिंद्रा यांनीही उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबोधित केले. हास्य प्रबोधनकार श्री. सुहास जोशी यांच्या विनोदी शैलीतील मार्गदर्शनाने उपस्थितांना ताण-तणावापासून मुक्त राहून आनंदी राहण्याचे महत्त्व पटवून देत मनोरंजनाची पर्वणी साधली.
       कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन उपअधीक्षक भूमी अभिलेख, अंबरनाथ श्रीमती सुवर्णा पाटील यांनी केले, तर नगर मापन अधिकारी, ठाणे, श्री. सिद्धेश्वर घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.