जागतिक आरोग्य दिनानिमित्त ठाणे जिल्ह्याचा आरोग्य क्षेत्रात दबदबा.!

ठाणे, दि.10(जिमाका): सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात ठाणे जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करीत दोन मानाचे पुरस्कार पटकाविले आहेत.
दि. ७ एप्रिल, २०२५ रोजी मुंबई येथील श्री. यशवंतराव चव्हाण सभागृहात विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानपरिषदेच्या सदस्या मनिषा कायंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, विरेन्द्र सिंह, आरोग्य सेवाचे आयुक्त तथा मुंबई राष्ट्रीय अभियानाचे संचालक अमगोथ श्री रंगा नायक, राज्य कामगार विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मुंबई आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्यासह राज्यातील विविध आरोग्य संस्थांचे प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
या गौरवशाली सोहळ्यात ठाणे जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालय, शहापूर या दोन आरोग्य संस्थांचा आरोग्य विभागाच्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.
या पुरस्कारांचा तपशील १. मोबाईल मेडिकल युनिट (MMU) उत्कृष्ट जिल्हा: ठाणे जिल्ह्याने मोबाईल मेडिकल युनिट (MMU) कार्यक्रमांतर्गत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यात जिल्ह्याने प्रशंसनीय कामगिरी केली आहे. २. SHSRC अंतर्गत उत्कृष्ट उपजिल्हा रुग्णालय (१०० खाटांचे): महाराष्ट्र आरोग्य प्रणाली सुधारणा प्रकल्पांतर्गत (SHSRC) ठाणे जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, शहापूर या १०० खाटांच्या संस्थेने उत्कृष्ट कार्यप्रणाली आणि रुग्णसेवेसाठी राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे, असा आहे.
ठाणे जिल्ह्यातील या दोन आरोग्य संस्थांनी मिळविलेल्या या यशाबद्दल जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, आरोग्य उपसंचालक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलाश पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धीरज महांगडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय, ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालय, शहापूर येथील सर्व अधिकारी, डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हे यश शक्य झाले आहे. या पुरस्कारामुळे जिल्ह्यातील इतर आरोग्य संस्थांनाही प्रेरणा मिळेल आणि ते अधिक उत्तम कार्य करण्यासाठी सज्ज होतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने ठाणे जिल्ह्याच्या या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे.
00000