पुणे : भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण होवो... सर्वत्र कायदा सुव्यवस्था अबाधित राहो... परराष्ट्र शक्तींचे निर्वाण होवो... देशबांधवांना सुस्थिती प्राप्त होवो... असा संकल्प करीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा 'दगडूशेठ' गणपतीला अभिषेक केला. यावेळी दहशतवादाविरोधी लढण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्ती प्रदान व्हावी, याकरिता गणरायाचरणी प्रार्थनाही त्यांनी केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे स्वागत व सन्मान मंदिरात करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, तुषार रायकर, सचिन आखाडे आदी उपस्थित होते. यावेळी ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांनी जे. पी. नड्डा यांनी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देखील दिली.
जे. पी. नड्डा म्हणाले, आज गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आलो. दहशतवाद्यांनी पेहलगाम मध्ये जे कृत्य केले, त्याला याला सडेतोड उत्तर देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आमची अपेक्षा आहे. या संकटातून देश ताकतीने पुढे जाईल आणि जे यामागे दोषी आहेत, त्यांना योग्य उत्तर देण्याकरिता गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळो. तसेच बुद्धी व शक्तीच्या माध्यमातून भारत या संकटकाळातून बाहेर येईल. याकरिता पंतप्रधान मोदी यांना शक्ती प्रदान होवो, ही प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
* फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे स्वागत व सन्मान मंदिरात करण्यात आला. यावेळी त्यांनी गणरायाला अभिषेक करीत आरती देखील केली.