भारतातील शासकीय शाळांच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप

पुणे, २३ सप्टेंबर : एमआयटी-एडीटी विद्यापीठ, पुणे येथे पार पडलेल्या रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२५ मध्ये शासकीय शाळांमधील ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विजय मिळवून भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे. आता हे चौदा विजेते संघ युरोपातील एस्टोनिया येथे होणाऱ्या रोबोटेक्स इंटरनॅशनल २०२५ या जागतिक स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवणार आहेत.
या भव्य स्पर्धेत देशभरातील १६ राज्यांतील ५,००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, जवळपास निम्मे विद्यार्थी ग्रामीण, आदिवासी आणि शासकीय शाळांमधून आले होते. गर्ल्स फायरफायटिंग, लाईन फॉलोअर, आंत्रप्रेन्युअरशिप चॅलेंज, मिनी सुमो आणि फोक रेस अशा विविध श्रेणींमध्ये ५०० हून अधिक रोबोट्सचे सादरीकरण झाले. कृषी, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या वास्तव समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. फलटण, औरंगाबाद, दादरा-नगरहवेली, दमण-दिऊ, लडाख, नवी दिल्ली, देहरादून, पुणे, बेंगळुरू, चेन्नई अशा विविध भागांतील तरुण विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा दाखवत तंत्रज्ञानाला सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनवले.
या यशामागे एसटीएल रोबोएज प्रोग्रॅम, बीएमसी इंडिया गर्ल्स हू बिल्ड रोबोट्स, ZS इंडिया, ग्लोबंट इंडिया, WNS केअर्स फाऊंडेशन, BNY मेलॉन, EY फाऊंडेशन, FICCI FLO पुणे आदी कंपन्यांचे सीएसआर उपक्रम आहेत.
रोबोटेक्स इंडिया च्या संचालिका पायल राजपाल म्हणाल्या की, “या मुलांच्या यशात फक्त कौशल्य नाही, तर दुर्गम गावांमधून जागतिक पातळीवर झेप घेण्याची चिकाटी आणि समानतेचे स्वप्न दडले आहे,” आतापर्यंत रोबोटेक्स इंडियाच्या माध्यमातून १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, देशभरात ५०० रोबोटिक्स-एआय लॅब्स आणि ७,००० हून अधिक शासकीय शिक्षकांचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. एस्टोनियामध्ये होणारी रोबोटेक्स इंटरनॅशनल स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी रोबोटिक्स महोत्सव असून यंदा तिचे २५ वे वर्ष आहे. ७५ हून अधिक देशांतील सहभागींमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची चमक ही देशासाठी अभिमानाची बाब ठरणार आहे.