राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळातील आठ नेत्यांचे पक्षातून निलंबन; विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याने कारवाई..

मावळ :-नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात काम केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) मावळ तालुक्यातील आठ पदाधिकारी यांच्यावर सहा – वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या आठही नेत्यांकडे विधानसभा निवडणुकीत केलेल्या पक्षविरोधी कृतीचे स्पष्टीकरण मागितले असता त्यांनी त्यांचे पदाचे राजीनामे सादर – केल्याने ही कारवाई केल्याचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी सांगितले.
नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके यांना उमेदवारी दिली होती. असे असतानाही या आठ नेत्यांनी व काही कार्यकर्त्यांनी पक्षाचा आदेश डावलून पक्षविरोधी काम केले. पक्षाची शिस्त मोडली. त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी जाहीर केले आहे.
या नेत्यांवर झाली निलंबनाची कारवाई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (अजित पवार) निलंबित झालेल्या नेत्यांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव वायकर, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, खादी ग्रामोद्योग – संघाचे माजी चेअरमन अंकुश आंबेकर, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शिवाजी असवले, राष्ट्रवादीचे तळेगाव शहराध्यक्ष संतोष – भेगडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुऱ्हे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेव शेलार यांचा समावेश आहे.