वायू आणि जल प्रदूषणामुळे काळभोरनगर येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात; माजी नगरसेविका मीनल यादव यांचे आयुक्तांना निवेदन

पिंपरी :-काळभोरनगर परिसरात वायू आणि जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागातील प्रदूषण थांबवावे, अशी मागणी माजी – नगरसेविका मीनल यादव आणि सूर्योदय कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
यावेळी माजी नगरसेविका मीनल यादव यांच्यासह स्मिता कुऱ्हाडे, माधवी भोसले, माधुरी खाडे, बिस्मिल्ला बी खान, मोनू रॉय, मंगल मोटे, अश्विनी टाकळकर, रूपाली मुजुमले आदी रहिवासी उपस्थित होते.
आयुक्तांना निवेदन दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, या भागातील निवासी क्षेत्राजवळ असलेल्या सिमेंट कारखाना विषारी आणि तिखट रासायनिक उत्सर्जन करत आहे. त्यामुळे स्थानिकांना श्वास घेण्यासाठी गंभीर समस्या आणि इतर आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. कारखान्याचे उत्सर्जन हा केवळ उपद्रवच नाही तर रहिवाशांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध यांना अधिक धोका आहे. तसेच सोसायटीच्या मागे वाहणाऱ्या कालव्यात औद्योगिक कचरा टाकला जातो. तो गंभीर जलप्रदूषणाचा स्रोत बनला आहे. केमिकल कंपन्या नाल्यात रासायनिक कचरा सोडत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या डोळ्यांना जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होतो. या समस्यांची गांभीयनि दखल घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.