राष्ट्रीय पोषण अभियान २०२५ अंतर्गत पोषण आहार प्रदर्शन व अंगणवाडी सेविकांचा सत्कार

राष्ट्रीय पोषण अभियान २०२५ अंतर्गत पोषण आहार प्रदर्शन व अंगणवाडी सेविकांचा सत्कार
पुणे, (छ.शिवाजी नगर): आपल्या देशात अजूनही अनेक मुले व माता कुपोषणाने त्रस्त आहेत. आरोग्यदायी व समर्थ भारत घडवायचा असेल, तर प्रत्येक घरात संतुलित आहार, स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. या अभियाना‌द्वारे सरकार व समाज एकत्र येऊन "सुपोषित भारत - समर्थ भारत" हे उ‌द्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण रोजच्या आहारात भाज्या, फळे, दूध, डाळी यांचा समावेश करा. मुलांच्या वाढीवर लक्ष ठेवा. माता व मुलींना योग्य पोषण मिळेल याची काळजी घ्या. जर आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले, तर नक्कीच कुपोषणमुक्त भारत घडवता येईल. "पोषण हा अधिकार आहे, जबाबदारी आहे आणि आरोग्यदायी भविष्यासाठी आवश्यक आहे." असे प्रतिमादन सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मारुतीशेठ भंडारी यांनी केले.

 
राष्ट्रीय पोषण अभियान २०२५ अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी उत्तर पुणे विभाग आणि सी.एम.बी. सामाजिक व शैक्षणिक संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण माह जनजागृती अभियान निमित्त अंगणवाडी सेविकांनी बनवलेल्या पोषण आहाराचे प्रदर्शन/स्पर्धा, यांचा सत्कार व देवी दर्शन या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी छत्रपती शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथे करण्यात आले होते. यावेळी कार्यमाच्या अध्यक्षस्थानी एकनाथ शेठ भंडारी (संस्थापक–सी.एम.बी. सामाजिक व शैक्षणिक संस्था), मनीषा व्ही. बिरारीस (बाल विकास प्रकल्प अधिकारी)
प्रा. एस.एस. सावंत (व्यवसाय मार्गदर्शक), मारुती शेठ भंडारी (अध्यक्ष –सी.एम.बी. सामाजिक व शैक्षणिक संस्था), आहारतज्ञ डॉ. आशुतोष कांबळे, सरपंच अंकुश काकरे, सुनिता किसनराव बांदल (कॉन्सिलर), संजीवनी सरवदे (मुख्य सेविका) आदी उपस्थित होते. 
 
या उपक्रमामध्ये साधारण ७० अंगणवाडी सेविकांनी सहभाग नोंदवला. पोषण आहारामध्ये पिठलं भाकरी, नाचणी कोल्हापुरी, लहचन चटणी, तिलंगा रईस, आप्पे, रताळ्याचा शिरा इत्यादी वेगवेगळ्या पदार्थांचा प्रदर्शनात समावेश होता.