सिल्लोड येथे बसस्थानक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय पर्यंत रस्ता देण्यासाठी परिवहन विभागाची मंजुरी
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.18, सिल्लोड - सोयगाव येथील बस स्थानकाचा विकास करण्यासह या आगारास नवीन बस देण्यात याव्यात तसेच इतर मागण्यांसंदर्भात आ. अब्दुल सत्तार यांनी वेळोवेळी या विभागाकडे पाठपुरावा केला त्याअनुषंगाने आज ( दि.18 ) सदरील विषयांवर परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या दालनात आ. अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असुन सिल्लोड आणि सोयगाव बस स्थानकात आवश्यक विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून देवू अशी ग्वाही दिली.
या बैठकीस परिवहन विभागाचे महाव्यवस्थापक ( स्थापत्य ) दिनेश महाजन, महाव्यवस्थापक ( वाहतूक ) नितीन मैंद, महाव्यवस्थापक ( नियोजन व पणन ) गिरीश देशमुख, विभागीय अभियंता श्रीमती आचार्यां, वाहतूक नियंत्रक , छत्रपती संभाजीनगर सचिन क्षीरसागर आदी अधिकारी उपस्थित होते.
सिल्लोड बसस्थानक हे जळगाव , बुलडाणा , जालना, कन्नड आणि छत्रपती संभाजीनगर या भागाला जोडणारे केंद्रस्थानी बसस्थानक आहे. त्यामुळे सदरील बसस्थानकात प्रवाशांची कायम वर्दळ असते. शिवाय जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ला बस ने प्रवास करणारे प्रवाशी सिल्लोड हुनच लेणी पाहण्यासाठी जातात. त्यासोबतच सोयगाव तालुका अतिदुर्गम तालुका असून खान्देश आणि धुळेकडे जाणारे प्रवासी सोयगाव येथूनच जातात. या ठिकाणी बस स्थानकाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे सिल्लोड आणि सोयगाव येथील बस स्थानकात विकास कामे करून प्रवाशांना अधिकाधिक सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच दोन्ही बसस्थानकात नवीन बस देने गरजेचे असल्याची बाब आ. अब्दुल सत्तार यांनी मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर बैठकीत सकारात्मक व सविस्तर चर्चा करण्यात आली.
सिल्लोड बस स्थानक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय पर्यंत रस्ता देण्यास परिवहन विभागाची मान्यता
या बैठकीत सिल्लोड बस स्थानक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय पर्यंत जाण्यासाठी रस्ता देण्याच्या प्रस्तावास परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी मंजुरी दिली आहे.
सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय , नगरपरिषद, रजिस्ट्री ऑफिस, कृषी उत्पन्न बाजार समिती, मुख्य व्यापार पेठ, व जुनेगाव कडे जाण्यासाठी मेन रोड वरून जावे लागत होते . या भागात जाण्यायेण्यासाठी एकच रस्ता असल्याने मेन रोडवर मोठ्या प्रमाणावर वर्दळ होवून अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होत असे त्यामुळे अनेक वेळेस अपघाताच्या घटना घडल्या. त्याअनुषंगाने यासाठी एक पर्यायी रस्ता असावा यासाठी आ. अब्दुल सत्तार यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाला लागून असलेल्या बस स्थानकाच्या जागेतून उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बाजूने किमान 30 फूट रस्ता देण्याची मागणी करत यासाठी पाठपुरावा केला होता. मुंबईत आज झालेल्या बैठकीत हा विषय निकाली काढण्यात आला. नागरिकांची गरज व वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेता आज मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी 15 फूट रस्ता मंजूर केला. याबद्दल आ. अब्दुल सत्तार यांनी ना. प्रताप सरनाईक व परिवहन विभागाचे आभार मानले.
सिल्लोड आणि सोयगाव आगाराला नवीन बस मिळाव्यात तसेच दोन्ही बस स्थानकात विकास कामे करणे व प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासंदर्भात आज मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीत सिल्लोड बस स्थानक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय पर्यंत जाण्यासाठी 15 फूट रस्ता देण्याच्या प्रस्तावास परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी मंजुरी दिली आहे. या रस्त्याच्या विकासासाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देवू - आ. अब्दुल सत्तार