इचलकरंजी मनपाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अलका कदम आणि मनीषा कांबळे यांची निवड

इचलकरंजी मनपाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अलका कदम आणि मनीषा कांबळे यांची निवड
इचलकरंजी मनपाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अलका कदम आणि मनीषा कांबळे यांची निवड

इचलकरंजी, दि. ५ सप्टेंबर : इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून सन २०२६ २७ या शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महानगरपालिका शाळा आणि अनुदानित खासगी प्राथमिक शाळा या दोन्ही विभागांतून प्रत्येकी एका शिक्षकाची निवड करण्यात आली आहे.

महानगरपालिका शाळांच्या गटातून विद्यानिकेतन मनपा शाळा क्रमांक २७ येथील सौ. अलका आनंदा कदम यांची, तर अनुदानित खासगी प्राथमिक शाळांच्या गटातून मालती माने विद्यामंदिर येथील सौ. मनीषा संदीप कांबळे यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याचे विविध पातळ्यांवर परीक्षण करून ही निवड करण्यात आली. स्वयमूल्यमापनापासून मुख्याध्यापक, केंद्रस्तर आणि शहरस्तरावरील मूल्यमापनापर्यंत विविध टप्प्यांतून शिक्षकांच्या कामगिरीचे परीक्षण करण्यात आले.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी, शाळेच्या विकासासाठी दिलेले योगदान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य या बाबींना निवड प्रक्रियेत महत्त्व देण्यात आले.

वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पद्धतीने झालेल्या मूल्यमापनानंतर अलका कदम आणि मनीषा कांबळे यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक योगदानाबद्दल शिक्षण विभाग तसेच शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.