मुंबई, १६ जुलै: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) चे प्रवक्ते महेश तपासे यांनी महाराष्ट्रात ७२ ते ७५ वरिष्ठ सरकारी अधिकारी व काही राजकारण्यांना कथित हनीट्रॅप घोटाळ्याने लक्ष्य केल्याच्या धक्कादायक मीडिया अहवालांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
हे जाळे मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसारख्या प्रमुख शहरांमध्ये पसरले असून, आपल्या राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेच्या विश्वासार्तेला धोका निर्माण झाला आहे.
मीडिया अहवालांचा हवाला देत तपासे म्हणाले की, उच्च पदस्थ अधिकारी आणि राजकारणी या हनी ट्रॅप खंडणीला बळी पडले ही बाब गंभीर व चिंताजनक आहे.
तपासे पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श प) खालील गंभीर मुद्द्यांवर सरकारकडून तातडीने उत्तरे मागत आहे:
* महाराष्ट्रात हनीट्रॅपच्या घटनांच्या मीडिया अहवालांवर सरकार गप्प का ?
* या मोठ्या 'हनीट्रॅप' ऑपरेशनने नोकरशहा आणि राजकारण्यांसह एवढ्या मोठ्या संख्येने उच्च प्रोफाइल व्यक्तींना लक्ष्य कसे केले?
* गुप्तचर यंत्रणा लवकर हस्तक्षेप करण्यात का अपयशी ठरल्या?
* भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी सरकार काय ठोस उपाययोजना करणार ?
तपासे म्हणाले की, बातमी अनुसार या रॅकेटचा 'मास्टरमाईंड' नाशिकचा असून एका मोठ्या राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी आहे.
एखाद्या उच्चस्पद व्यक्तीला हनी ट्रॅप मध्ये अडकविण्यासाठी आरोपी व्यथित व्यक्ती असल्याचं भासवून, डिजिटल आणि वैयक्तिक संवादातून विश्वास संपादन करून, त्यानंतर ब्लॅकमेल करण्यासाठी तडजोडीच्या छायाचित्रांचे आणि व्हिडिओंना गुप्तपणे रेकॉर्ड करून खोट्या बलात्काराच्या आरोपांची धमकी देते. हे एक अत्यंत संघटित गुन्हेगारी कृत्ये आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श प) चे महेश तपासे यांनी सरकारला आवाहन केले की या प्रकरणाबाबत तपास पूर्ण पारदर्शकतेने करावा व गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत.
आपल्या प्रशासकीय नेतृत्वावर ठेवलेला विश्वास सर्वोच्च आहे आणि हे प्रकरण खरे असल्यास त्या विश्वासाला गंभीर तडा जाईल असे विधान महेश तपासे यांनी केले.
राज्याचा प्रशासनावरील विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी आणि कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी या प्रकरणातील सर्व संबंधित आरोपींचा शोध घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष करत आहे असे महेश तपासे म्हणाले.