गावदेवी मार्केटचे नूतनीकरण पूर्ण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
ठाणे, २७ ऑगस्ट २०२६ : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून अवघ्या ६० दिवसांत नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आग विझविताना प्राण गमावलेल्या सागर शिंदे आणि काळू गाडेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या दोघांना शहीद दर्जा देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
गावदेवी मार्केटला २१ मे २०२६ रोजी शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत मार्केटमधील सर्व ओटले जळून खाक झाले होते आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. दुर्घटनेनंतर ठाणे महानगरपालिकेने युद्धपातळीवर काम हाती घेत अवघ्या दोन महिन्यांत मार्केटचे नूतनीकरण पूर्ण केले.
नूतनीकरण करण्यात आलेल्या मार्केटमध्ये नवीन विद्युतीकरण व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, फायर अलार्म सिस्टीम तसेच रंगरंगोटी आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक त्या सुरक्षाविषयक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. तसेच व्यावसायिकांनीही आपल्या आस्थापनांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
गावदेवी मार्केटचे नूतनीकरण निर्धारित वेळेत पूर्ण केल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर, आयुक्त सौरभ राव आणि ठाणे महानगरपालिकेच्या संपूर्ण यंत्रणेचे कौतुक केले.
या कार्यक्रमास खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ ऊ. शानू पठाण, आयुक्त सौरभ राव, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या सभापती मीनल संखे, स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, अनिता गौरी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, दीपक झिंजाड, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, मोहन कलाल यांच्यासह गावदेवी मार्केटमधील ओटलेधारक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.