ठाण्यात २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान रंगणार ३१ वा संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोह
ठाणे, दि. १८ : ठाणे महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ वा संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोह २७ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारोहात ज्येष्ठ कलाकारांचे गायन-वादन, संगीत नाटक, नृत्य आणि विविध सांगीतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. यंदाचा संगीतभूषण पं. राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार पं. शैलेश भागवत यांना, तर युवा पुरस्कार हेमा उपासनी यांना जाहीर झाला आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
महापालिकेतील कै. अरविंद पेंडसे सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त दीपक झिंजाड, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद ठाणे शाखेचे कार्याध्यक्ष नरेंद्र बेडेकर, प्रमुख कार्यवाह दुर्गेश आकेरकर, कोषाध्यक्ष अंबरीष ओक, सहकोषाध्यक्ष महेश शानभाग, कार्यकारिणी सदस्य मकरंद जोशी आदी उपस्थित होते.
यंदाचा संगीतभूषण पं. राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ संगीत कलाकार पं. शैलेश भागवत यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ असे आहे. युवा पुरस्काराने हेमा उपासनी यांना गौरविण्यात येणार असून, त्यांना २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ प्रदान करण्यात येणार आहेत.
समारोहाची सुरुवात २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता श्रुती मराठे यांच्या गायनाने होईल. त्यानंतर रात्री ८.३० वाजता पद्मविभूषण डॉ. एन. राजम यांचे व्हायोलिनवादन होणार आहे.
दुसऱ्या दिवशी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता भरत नाट्यमंदिर, पुणे यांच्यातर्फे 'बंध रेशमाचे' या संगीत नाटकाचे सादरीकरण होईल. सायंकाळी ८ वाजता वेदश्री खाडीलकर ओक आणि आदित्य ओक 'आशाताई एक सूरदासी' हा विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर करतील. रात्री ९.३० वाजता गायिका सावनी शेंडे यांच्या गायनाने दुसऱ्या दिवसाची सांगता होईल.
समारोहाच्या तिसऱ्या दिवशी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विदुषी नंदिनी बेडेकर आणि त्यांच्या शिष्या 'स्वरानुभूती' हा विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमातून गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या समग्र गायकीचा अनुभव रसिकांना घेता येणार आहे.
सायंकाळी ४ वाजता यती भागवत आणि स्वप्नील भिसे यांचे तबला सहवादन होईल. त्यानंतर ५ वाजता पं. मुकुंदराज देव यांचा गायन, वादन आणि नृत्य यांचा संगम असलेला 'अनुभूती' हा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७ वाजता ओंकार दादरकर यांचे, तर रात्री ८.३० वाजता पं. गिरीष संझगिरी यांचे गायन होईल. रात्री १० वाजता पं. सुहास व्यास यांच्या गायनाने समारोहाची सांगता होणार आहे.
संगीतभूषण पं. राम मराठे यांच्या संगीत परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, शास्त्रीय संगीताची अभिरुची जोपासणे आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा समारोहाचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण समारोह विनामूल्य असून, कार्यक्रमांच्या प्रवेशिका २२ नोव्हेंबर २०२६ पासून राम गणेश गडकरी रंगायतन येथे उपलब्ध होणार आहेत.
ठाणे शहरातील संगीतप्रेमी, कलारसिक आणि नागरिकांनी या तीन दिवसीय सांगीतिक समारोहाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले आहे.