पनवेल महापालिकेच्या विशेष सभेत विविध विषय मंजूर

पनवेल महापालिकेच्या विशेष सभेत विविध विषय मंजूर

पनवेल, दि. १५ : पनवेल महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा क्रमांक ११ गुरुवारी १५ ऑक्टोबर रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत विविध विकासकामे, परिवहन सेवा, उड्डाणपुलांची उभारणी आणि युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण यांसह महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली.

या सभेला आयुक्त मंगेश चितळे, उपमहापौर प्रमिला पाटील, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे आणि महापालिका सचिव नानासाहेब कामठे उपस्थित होते.

पनवेल महानगरपालिकेची स्वतःच्या मालकीची परिवहन सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावावर सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर या विषयाला मंजुरी देण्यात आली. तसेच महापालिका क्षेत्रातील रेल्वे फाटक नसलेल्या ठिकाणी महारेलच्या माध्यमातून रेल्वे उड्डाणपूल उभारण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२५-२६ अंतर्गत नगरोत्थान महाअभियानाच्या जिल्हास्तरीय योजनेतील ७८ कामांना प्रशासकीय महासभेची मंजुरी मिळण्यासंदर्भातील विषयही सभेत मंजूर करण्यात आला.

महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत शहरातील युवकांसाठी तांत्रिक आणि अतांत्रिक विषयांतील मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संबंधित क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने युवकांसाठी मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली.

याशिवाय महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सहकार्याने युवकांसाठी तांत्रिक आणि लघुउद्योजकता विकासाचे मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा विषय मंजूर करण्यात आला. यामुळे युवकांना कौशल्य विकासासोबतच स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष व्यवस्थापनाच्या दृष्टीने वृक्ष प्राधिकरण समिती गठित करण्यासाठी सदस्यांची नावे नामनिर्देशित करण्यासंबंधीचा प्रस्तावही सभेत मंजूर करण्यात आला.

या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या विविध प्रस्तावांमुळे शहरातील पायाभूत सुविधांचा विकास, परिवहन व्यवस्था, युवकांचे कौशल्यवर्धन आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.