पिंपरी चिंचवडमध्ये आता खासदार सुनेत्रा पवारांचे ‘लक्ष’; महापालिकेत बैठक घेत आयुक्तांना केल्या ‘या’ सूचना

पिंपरी :-पिंपरी चिंचवड हा अजितदादा पवारांचा बालेकिल्ला मानला जायचा, आज याचं पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांच्या पत्नी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवारांना लक्ष घालण्याची वेळ आली आहे. सुनेत्रा पवारांनी आज पहिल्यांदाच शहराच्या राजकारणात लक्ष घातले आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांसह आयुक्त शेखर सिंह यांची बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादीने सांगितलेल्या कामांची तरतूद बजेटमध्ये करावी अशा सूचना त्यांनी आयुक्तांना दिल्या आहेत.
या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राजू मिसाळ, श्याम लांडे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नारायण बहिरवाडे, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, प्रसाद शेट्टी, राजू बनसोडे, विनोद नढे, संतोष कोकणे, माजी नगरसेविका माई काटे, माया बारणे, पक्षप्रवक्ते फजल शेख, वर्षा जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बजेटमध्ये भाजपलाच ‘झूकते माप’..
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड मध्ये २०१७ च्या महापालिका निवडणुकीत सत्तांतर झाले. तेव्हापासून महापालिकेत भाजपाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलले असून राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या महायुतीची सत्ता आली आहे. असे असताना नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या बजेटमध्ये भाजपचाच वरचष्मा पाहायला मिळाला. भाजपाचे आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे आणि उमा खापरे यांनी आपली ताकद लावून या अर्थसंकल्पात झुकते माप स्वतःच्याच पारड्यात टाकून घेतले आहे.
राष्ट्रवादीचाही आयुक्तांवर दबाव हवा..
राज्यात महायुतीची सत्ता असली तरी स्थानिक पातळीवर कामे करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यावर दबाव असू शकतो. परंतु आमचे अजितदादा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुद्धा आहेत, त्यामुळं आमचा ही दबाव आयुक्तांवर असायला हवाच असं स्थानिक राष्ट्रवादीचं म्हणणं होतं. अजितददांवर पक्ष आणि राज्याची जबाबदारी असल्यामुळे खासदार सुनेत्रा पवार यांना शहरातील राजकारणात आता लक्ष घालण्याची वेळ आली आहे.
त्याच अनुषंगाने खासदार सुनेत्रा पवार यांनी आज महापालिका आयुक्तांसमवेत बैठक घेऊन बजेटमध्ये राष्ट्रवादीने सांगितलेल्या कामांची तरतूद करावी, अशा सूचना दिल्या आहेत. नुकत्याच सादर झालेल्या पालिकेच्या बजेटमध्ये आयुक्तांनी भाजपला झुकतं माप दिलं असा राष्ट्रवादीचा आरोप आहे. तसाच न्याय मिळावा म्हणून स्थानिक राष्ट्रवादीने हा खटाटोप केला आहे. यानिमित्ताने भाजप-राष्ट्रवादीत बजेटसाठी चढाओढ सुरु झाली आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बजेट सादर होत असल्यानं भाजप-राष्ट्रवादीत अशी रस्सीखेच सुरु झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.