जाॅली मोरे, सीमा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या गायनाने उपस्थित मंत्रमुग्ध
पुणे : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) तर्फे जागर संविधानाचा या उपक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज, प्रियदर्शी सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वभूषण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत आज बोपोडीमध्ये शानदार संगीत महानाट्य व शाहिरी जलसा पार पडला. या कार्यक्रमाला पुण्यातील आंबेडकर प्रेमी जनतेची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या एकाहून एक सुमधूर व दर्जेदार बुद्ध-भीमगीतांना व पोवाड्यांना उपस्थितांनी जोरदार दाद दिली.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रदेश संगठन सचिव परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या पुढाकारातून बोपोडीमध्ये वी द पीपल ग्रुपचा हा शाहिरी जलसा आणि बहुजन महानायकांच्या स्मृती जागवणारा कार्यक्रम पार पडला. सुप्रसिद्ध गायिका तथा अभिनेत्री सीमा पाटील आणि भीमगीतांसाठी सुप्रसिद्ध असलेले जाॅली मोरे यांच्या चमूने या वेळी एकाहून एक दर्जेदार व समधूर गीतांची प्रस्तुती दिली. खास करून सीमा पाटील यांच्या सादरीकरणाने उपस्थित आंबेडकरप्रेमी जनता अक्षरशः भारावून गेल्याचे दिसून आले. सीमा पाटील यांनी जिजाईचा तो शिवा अन् भीमाईचा तो भीमा या गाण्याने उपस्थित रसिकांच्या हृदयाला हात घातला. सीमा पाटील यांनी आपल्या गीतामधूनच त्यांचा बुद्ध धम्माकडे जाण्याच्या प्रवासाचे सुंदर वर्णन केले, तसेच त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून ते सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व बहुजन महानायकांच्या उत्तुंग कार्याची मांडणी केली. कार्यक्रमात भगवान गौतम बुद्धांना मारायला आलेल्या अंगुलीमालाचे तसेच सम्राट अशोकाचे कसे मतपरिवर्तन झाले, याचा जीवंत प्रसंग गीत व नाट्याद्वारे सादर करण्यात आला.
जाॅली मोरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी एकाहून एक सरस बुद्ध-भीमगीतांची प्रस्तुती दिली. या सर्वांना संगीताची अत्यंत तोलामोलाची साथ त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे सचिव दीपक म्हस्के यांनी केले.