स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या रा. से. यो.च्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे अजनसोंड मध्ये उदघाटन

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या रा. से. यो.च्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे अजनसोंड मध्ये उदघाटन

पंढरपूर– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने अजनसोंड (ता. पंढरपूर) मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे नुकतेच उदघाटन करण्यात आले.
        प्रारंभी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ. ज्योती घाडगे यांच्या हस्ते करून ‘युथ फॉर माय भारत’ व ‘डिजिटल साक्षरतेसाठी युवक’ या स्लोगन खाली या ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे उदघाटन करण्यात आले. या उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे हे होते. रा.से.यो.चे सल्लागार डॉ. यशपाल खेडकर यांनी प्रास्ताविकात दि.९ फेब्रुवारी पासून ते दि.१५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आठवडाभर चालणाऱ्या या ‘राष्ट्रीय सेवा योजने’च्या शिबिराची संपूर्ण रूपरेषा व यासंबंधी सविस्तर माहिती दिली. यावेळी माढा विधानसभेचे माजी आमदार विनायकराव पाटील म्हणाले की, ‘सेवा ही कोणत्याही अपेक्षेशिवाय केली जाणारी गोष्ट आहे. जशी आपली आई कोणत्याही अपेक्षेशिवाय सर्वांसाठी अविरतपणे काम करत असते तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून नि:स्वार्थपणे काम केले पाहिजे. कोणत्याही अपेक्षा न ठेवता कार्य करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा सारखे लोक समाजासाठी पूजनीय व वंदनीय असतात.’ असे सांगून त्यांनी किंमत व मूल्य, सेवा आणि नोकरी, दूध आणि दारू यातील फरक स्पष्ट केला.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे रा.से.यो.चे संचालक डॉ. राजेंद्र वडजे म्हणाले की, ‘एन.एस.एस.चे शिबीर ही विद्यार्थ्यांना आपले समाजाप्रती योगदान देण्यासाठी चालून आलेली एक सुवर्णसंधी असते. हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी अनेक त्रास सहन करून त्या गावाचे रुपांतर राज्यात एका आदर्श खेड्यात केले. पर्यावरण, शेती, आरोग्य, वृक्षारोपण अशा विविध पातळींवर त्यांनी कठीण परिश्रम घेऊन त्या गावात अमुलाग्र बदल केला. प्रत्येक गावात एक पोपटराव पवार लपलेले आहेत. त्या व्यक्तिमत्वास आकार देणे गरजेचे आहे आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अशी व्यक्तीमत्वे तयार होत असतात.’ असे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. राष्ट्रीय सेवा योजनेचे पंढरपूर विभागीय समन्वयक डॉ. संजय मूजमुले म्हणाले की, ‘एन.एस.एस. हे विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय मोलाचे व्यासपीठ असून या आठवडाभर चालणार्‍या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी गावातील समस्या जाणून घेऊन त्या समस्यांशी एकरूप होणे आवश्यक आहे तसेच या समस्या आपल्या कार्यातून कशा सोडवता येतील या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.’ अध्यक्षस्थानावरून बोलताना स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे म्हणाले की, ‘सुरुवातीपासूनच आपुलकी वाटणाऱ्या अजनसोंड गावात आपल्या स्वेरी महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर होत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे. आज आपल्या देशात 'भारत' आणि 'इंडिया' असे दोन भाग असल्याचे बोलले जाते. आपण ‘विकसनशील असलेल्या भारताचा’ एक भाग आहोत ही आपल्यासाठी नशिबाची बाब आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊन ते प्रश्न समूळ सोडवण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या शिबिरा दरम्यान कार्यशील राहून समाजसेवेची संधी घेतली पाहिजे.’ यावेळी अजनसोंडचे उपसरपंच बाळासो कांबळे, पोलीस पाटील सौ. मेघा घाडगे, हनुमंत घाडगे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस. मठपती,   तसेच अजनसोंड मधील ग्रामस्थ उपस्थित होते. आठवडाभर चालणाऱ्या या शिबिरात स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे हे शिबीर व्यवस्थित पार पाडण्यासाठी रा. से.यो.चे कार्यक्रम अधिकारी डॉ. डी.एस. चौधरी, डॉ.एम.एम.अवताडे,  प्रा. ए.बी.चौंडे, प्रा. एस.बी. गायकवाड, प्रा.के. एस.पुकाळे, प्रा. जी.जी. फलमारी, प्रा. काजल चोरकर, प्रा. एस.बी. खडके, प्रा. एम.ए. सोनटक्के, प्रा. ए.व्ही.भानवसे, प्रा. सूरज कोळी, प्रा. एस. डी. इंदलकर यांच्या सह विद्यार्थी स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. कु. कोमल कसबे आणि संगमेश्वरी कोरे यांनी सुत्रसंचालन केले तर सोनाली करवीर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.