स्वेरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी

स्वेरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी

पंढरपूर– ‘आपली सदसदविवेकबुद्धी जागृत ठेवून कार्य केल्यास यशाची शक्यता वाढते त्यासाठी आपण स्वतःशी संवाद साधला पाहिजे. आपण आपल्याशी बोललो की खरं काय आणि बरं काय हे समजते. एकूणच आपण आपल्या दु:खात गुरफटतो. त्यामुळे त्याचे ओझे वाहताना खऱ्या आनंदाला मुकतो. ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘हु वेअर दि क्षुद्राज’ अशी अनेक पुस्तके डॉ. आंबेडकरांनी लिहिली. डॉ. आंबेडकरांच्या लिखाणातून तत्कालीन समाजसंस्कृती डोकावते. डॉ. आंबेडकरांची जयंती केवळ जयजयकारापर्यंतच नको तर त्यांच्या  आचार, विचार आणि कर्तुत्वाचा जयजयकार केला पाहिजे.’ असे प्रतिपादन टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय, खडकी, पुणे चे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले.


           स्वेरीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. संजय चाकणे हे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिवेंद्रम (केरळ)च्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. ह्या होत्या. महाराष्ट्र गीत व स्वेरी गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली. भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनानंतर स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्तविकात ‘एका सर्व सामान्य कुटुंबात जन्म झालेल्या डॉ. आंबेडकरांनी अनेक संकटांचा सामना करून उच्च शिक्षण घेतले. त्या काळी दुर्दैवाने आपल्याच समाजाच्या एका घटकाला माणूस म्हणून जगण्याची मुभा नव्हती अशा काळात ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश देऊन समाजाला बळ देण्याचे महान कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. म्हणून ‘माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळाली पाहिजे’ या थोर विचारांच्या भक्कम पायावर पुढे डॉ. आंबेडकरांनी समाजाची परिस्थिती बदलण्यासाठी कार्य केले.’ असे सांगून डॉ. आंबेडकर यांचे कार्य व कर्तुत्वावर प्रकाश टाकला. पुढे बोलताना प्र.पाहुणे प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणाले की, ‘डॉ. बाबासाहेब मनामनामध्ये रुजवायचे असतील तर आपली वैचारिक पातळी सुधारण्याची गरज आहे. यासाठी प्रथम आपल्या हाताखालील माणसं मोठी करा आपण आपोआप मोठे होतो. इंजिनिअर तर सर्वच जण होतात पण ‘शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी इंजिनिअर व्हा’. असे आवाहन डॉ. चाकणे यांनी केले. अध्यक्षीय भाषणातून आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. यांनी शिक्षणाचे महत्व आणि प्रशासकिय यंत्रणेतील योगदान याबाबत म्हणाल्या की, ‘शाळा, कॉलेजेसचे आमंत्रण मी नेहमी स्वीकारते कारण मला विद्यार्थ्यांसोबत संवाद साधायला आवडते. मी केरळमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आहे. शाळेमध्ये असताना माझा प्रथम क्रमांक कधीच नव्हता आणि मी एक सामान्य विद्यार्थिनी होते. पदवीच्या शिक्षणानंतर मी यूपीएससीची तयारी सुरू केली. परीक्षेमध्ये काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात तर काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत त्याच गोष्टींवर आपण भर दिला पाहिजे. परीक्षा मधील चुकातून शिकण्याने आपण खऱ्या अर्थाने घडत असतो. अपयश हे कधीही शेवटचे नसते. त्यामुळे परिश्रमात सातत्य ठेवल्यास आपले ध्येय गाठता येते. यासाठी सकारात्मक विचाराने अभ्यास करा आणि हे सर्व शिक्षणाने साध्य होते.’ असे सांगून स्पर्धा परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी देखील स्पर्धा परीक्षेबाबत कुतूहलाने प्रश्न विचारले असता आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. यांनी समर्पक उत्तरे दिली. पुणे येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजिलेल्या ‘डिपेक्स’ या राष्ट्रीय स्तराच्या संशोधन परीक्षेत स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला त्याबद्दल विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ‘स्वेरीयन’ या त्रैमासिक अंकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले. यावेळी स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, किर्लोस्कर कंपनीचे एच.आर. ऋषिकेश कुलकर्णी, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, डिग्री इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार,  विद्यार्थिनी सचिवा नम्रता घुले यांच्यासह स्वेरी संचलित अभियांत्रिकी व फार्मसीचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व चारही महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. साक्षी शिंदे व प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ या ब्रीद वाक्याचे स्पष्टीकरण देऊन सर्व उपस्थितांचे आभार मानले.