जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीडतर्फे बालविवाह मुक्त भारत, POCSO कायदा, व्यसनमुक्ती व पर्यावरण संरक्षणावर जनजागृती शिबिर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीडतर्फे बालविवाह मुक्त भारत, POCSO कायदा, व्यसनमुक्ती व पर्यावरण संरक्षणावर जनजागृती शिबिर
बीड दि. 23 ( जिमाका ) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड यांच्या वतीने दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी लक्ष्मणराव जाधव प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, नामलगाव फाटा (ता. जि. बीड) येथे बालविवाह मुक्त भारत अभियान, POCSO Act (बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा), व्यसनमुक्ती व पर्यावरण संरक्षण या विषयांवर जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यादवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून न्यायाधीश वहाब ए. सय्यद (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड), एस. टी. शिंदे (अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड), अशोक तांगडे (अध्यक्ष, बालकल्याण समिती, बीड), तत्त्वशील कांबळे (अधिकार मित्र) व मिथुन जोगदंड आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना न्यायाधीश वहाब ए. सय्यद यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून ध्येय निश्चित करण्याचे, शिक्षणाचे महत्त्व, बालविवाहाचे दुष्परिणाम व प्रतिबंधक कायद्यांतील तरतुदी यांची माहिती दिली. बालविवाह घडण्यामागील कारणे स्पष्ट करून बालविवाह मुक्त भारत घडविण्यासाठी सर्वांनी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच व्यसनमुक्ती व पर्यावरण संरक्षण या विषयांवरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध हेल्पलाईन क्रमांक १०९८ व ११२०० यांची माहिती देण्यात आली. बालविवाह रोखण्यासाठी पालक, विद्यार्थी व समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहण्याचे आवाहन अशोक तांगडे यांनी केले.
अडथळ्यांवर मात करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मार्गदर्शन शिबिरात करण्यात आले. 
बालकांनी अनोळखी व्यक्तींशी आपली वैयक्तिक माहिती देऊ नये, कोणाकडून वस्तू घेताना सावध राहावे व स्वतःचे संरक्षण करावे, असा संदेश देण्यात आला. कोणी छेड काढल्यास त्वरित प्रतिकार करून मदत घ्यावी, असेही सांगण्यात आले.
बालकांना मागण्यास व संरक्षण देण्यासाठी POCSO कायदा अस्तित्वात असून त्यातील तरतुदींची माहिती देण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत बालविवाह होऊ नये, तसेच बालविवाहाची माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांक १०९८ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. 
 
बालविवाह रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच पर्यावरणाचे महत्त्व या विषयावरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
अधिकार मित्र तत्त्वशील कांबळे यांनी व्यसनमुक्तीपासून बालकांचे संरक्षण कायदा २०२४ अर्थात नालसाची ‘डॉन’ स्कीम याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. व्यसनांमुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक नुकसान व त्याचे दुष्परिणाम यांची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
अधिकार मित्र मिथुन जोगदंड यांनी “मुलांचे हक्क, मुलांची सुरक्षा आहे—POCSO कायदा तुमच्या सोबत आहे,” असा संदेश देत बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याची माहिती दिली. शालेय परिसर, बसस्टॉप, सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर अनोळखी व्यक्तीकडून वस्तू देणे हा गुन्हा असून मोबाईलवरून मुलांना चॅटिंगद्वारे फसवणे वा छेड काढणे हेही गुन्हे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रसंगी एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
कार्यक्रमात महत्त्वाचे टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आले—
बालविवाह हेल्पलाईन: १०९८
 
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नालसा) हेल्पलाईन: १५१६
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डोंगरे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक खोड सर यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेचे शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सुरक्षित, शिस्तबद्ध, जबाबदार व संवेदनशील नागरिक होण्यासाठी कायदेशीर मदतीचा योग्य मार्ग वापरण्याचा संदेश मिळाला.