हिंगोली (जिमाका), दि. 07 : प्रसिद्ध दिवंगत गायक प्रल्हाद शिंदे यांच्या लोक गायकीचा वारसा पुढे नेणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत शिंदे, युवा गायक रवींद्र खोमणे व मयूर सुकाळे यांच्यासह सहकाऱ्यांनी सादर केलेल्या विविध लोकगीते, भक्ती गीते, अभंग, गवळण, भीम गीते, पोवाडा, गोंधळ, कव्वाली अशी विविध प्रकारची गाणी सादर करून लोक संगीत महोत्सवाला चार चांद लावले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने हिंगोली येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित लोकसंगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार (दि. 6) रोजी महाराष्ट्रातील या सुप्रसिद्ध गायकांनी लोकसंगीताची ही मैफल सजविली.
युवा गायक रवींद्र खोमणे आणि मयूर सुकाळे यांनी सादर केलेल्या शाहीर पठ्ठे बापूरावांच्या आधी गणाला रणी आणीला l नाहीतर रंग पुन्हा सुना सुना l या पारंपारिक गणाने या लोकसंगीत महोत्सवास प्रारंभ झाला. त्यानंतर शोधून शिणला जीव आता रे l साद तुला पोहोचेल का ? दारोदारी थांग तुझा कधी लागेल का ? बघ उघडून दार जरा l देव धावलं का ? चल गं सखे, चल गं सखे पंढरीला l हा पंढरीच्या विठुरायाची आळवण करणारा अभंग, उजाडू दे आज पडू दे पाऊल पुढे l तू आभाळ आभाळ वादळ l गोकुळात रंग खेळतो श्रीहरी l गाऊ नको हे रे, गाऊ नको जाऊ नको रे कृष्णा ही शाहीर या चित्रपटातील गाजलेली गवळण, रुतल्या मनामंदी नजरेच्या कट्यारी l प्रीतीचे फुल फुलले, आनंद पोटात माझ्या माईना, दत्त दर्शनाला जायचं जायचं हे भक्ती गीत त्याचबरोबर बाजाराला विकण्या निघाली, दही, दूध, ताक आणि लोणी l बाई माझ्या गं l दुधात नाही पाणी l ही सर्वांग सुंदर गवळण, आली ठुमकत नारं लचकत, मान मुरडत, हिरव्या रानी l ही पुरुषप्रधान लावणी, छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी यांचा पोवाडा, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान गाणारे माझ्या राजा रं l माझ्या शिवबा रं l, शोधू कुठे राजाला l, राजं आलं l जिंकूनिया जगभरी l शिवा नाव राजा गाजले, जीवा शिवाची बैल जोड, डौल मोराच्या मनाचा, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर अशी एकाहून एक सरस गाणी रवींद्र खोमणे व मयूर सुकाळे यांनी सादर केली. गायक चंद्रकांत शिंदे यांनी विठ्ठलाच्या पायी वीट l झाली भाग्यवंत l बाई पंढरपुरात काय वाजत गाजत l सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं l चांदण्याची छाया l कापराची काया l माऊलीची माया होता l माझा भिमराया l नांदण नांदण, होतं रमाच नांदण l भिमाच्या संसारी जसं टिपूर चांदणं l एक ओठात हायं l एक पोटात हायं l पुढारी बाजार पेठात हायं l पण भीमराव काळजाच्या देठात हायं l खंडोबारायाचं याड बाई लागल मुरळीला l लागलं मुरळीला गं बाई लागल वाघ्याला l जव्हा नवीन पोपट हा l काय सांगू मेरी बरबादी रे l सून मेरी अमिना दीदी l जवा रात्री या आंटीची घंटी मी वाजवली l जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा, उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, तुझा खर्च लागला वाढू सांग किती मी कर्ज काढू, दर्शन दे रे, दे रे भगवंता l तू भिमाईचा पान्हा, मी रमाईचा तान्हा, तुझाच गोजिरवाणा भिमराया l अशी अविट गोडीची लोकप्रिय गाणी सादर करीत रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात रसिक प्रेक्षकांनी गायक चंद्रकांत शिंदे यांचे भरभरून स्वागत केले.
युवा गायक सिद्धार्थ जाधव यांनी प्रतापसिंह बोधले यांच्या लेखनीतून साकारलेले दोनच राजे इथे गाजले l या कोकण पुण्य भूमीवर l एक त्या रायगडावर l एक चवदार तळ्यावर l भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते l तलवारीच्या त्यांच्या न्यारेच टोक असते l ही गाणी सादर केली. या सर्व गायकांना अंकुश बोरुडे, अनिकेत गवळी, विजेंद्र मीमरोट, कुणाल वानखेडे रोहित बनस्वाल अशी संगीत साथ दिली. प्रसिद्ध युवा गायक कुणाल वराळे यांनी या लोकसंगीत मैफलीचे बहारदार सूत्रसंचालन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व गायकांचा यावेळी प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.
या लोकसंगीत महोत्सवातील गायकांना ऐकण्यासाठी हिंगोली शहर आणि जिल्ह्यातील श्रोत्यांनी गर्दी केली होती.