स्वेरीचे डॉ. माणिक देशमुख हे एनपीटीइएल स्टार पुरस्काराने सन्मानित

स्वेरीचे डॉ. माणिक देशमुख हे एनपीटीइएल स्टार पुरस्काराने सन्मानित

पंढरपूर: गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)च्या सिव्हिल इंजिनिअरिंग मधील सहयोगी प्राध्यापक डॉ. माणिक गुंडेराव देशमुख यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबाबत एनपीटीइएल स्टार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दि.१ फेब्रुवारी २०२५ रोजी आयआयटी मुंबई येथे आयोजिलेल्या समारंभात आयआयटी मुंबईचे समन्वयक अँड्रु थंगराज, प्रा. नंदिता आणि आयआयटी मद्रासच्या प्रा. भारती यांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
        एनपीटीइएल (नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नोलॉजी एनहेंसड लर्निंग) हे आयआयटी आणि आयआयएससी तर्फे राबविले जाणारे एक व्यासपीठ असून, अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान व व्यवस्थापन यासारख्या विविध क्षेत्रांतील उच्चस्तरीय शिक्षण विनामूल्य प्रदान करते. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्याने विद्यार्थी आणि प्राध्यापकांना सखोल तांत्रिक ज्ञान, नवीन तंत्रज्ञान समजून घेण्याची संधी, उद्योगातील अद्ययावत माहिती, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक संधी मिळतात. डॉ. माणिक देशमुख हे २०१८ पासून स्वेरीज् कॉलेज ऑफ  इंजिनिअरिंगच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागात कार्यरत असून त्यांनी भूगर्भ अभियांत्रिकी (जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग) विषयात पीएच.डी. प्राप्त केली आहे. उपक्रमशील शिक्षक असलेले डॉ. देशमुख यांनी आजपर्यंत एकूण ३७ एनपीटीइएल अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केले असून त्यापैकी ९ अभ्यासक्रमांसाठी त्यांना स्टार प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विविध शाखांमध्ये विशेषतः भूगर्भ अभियांत्रिकी, काँक्रीट तंत्रज्ञान, रस्ते अभियांत्रिकी, संरचना अभियांत्रिकी आणि पर्यावरणीय टिकाऊ अभियांत्रिकी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल अध्ययन केले आहे. त्यांच्या या योगदानामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान व आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध होत आहे. संस्थेचे सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे म्हणाले की, 'डॉ. माणिक देशमुख यांनी उच्चस्तरीय शिक्षण व संशोधन क्षेत्रात केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या ज्ञानाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्यांची ही शैक्षणिक जिद्द आणि राखलेले सातत्य हे गुणवत्तेसाठी प्रेरणादायी आहे. भविष्यातही असेच उल्लेखनीय कार्य सुरू राहो.’ या सन्मानानंतर डॉ. माणिक देशमुख यांनी स्वेरीबाबत कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले की, ‘डॉ. बी.पी. रोंगे सर आम्हा शिक्षकांना नेहमी नवनवीन शिक्षण घेवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर कशी टाकता येईल यासाठी सहकार्य व प्रेरणा देत असतात. ही बाब प्राध्यापक आणि संशोधकांच्या दृष्टीने अत्यंत सन्मानाची आहे.’ संशोधन अभ्यासक्रमांमुळे तंत्रज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रात सतत नवनवीन शिकण्याची संधी मिळते.’ त्यांच्या यशाबद्धल संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख,सर्व विश्वस्त व पदाधिकारी स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एम. पवार, संस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम,जी.मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, इंजिनिअरींगच्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ. माणिक देशमुख यांचे अभिनंदन केले.