दोन कोटींची लाच मागणाऱ्या फौजदाराचे निलंबन

दोन कोटींची लाच मागणाऱ्या फौजदाराचे निलंबन

पिंपरी :-दोन कोटींची लाच मागणाऱ्या फौजदाराचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. तसेच, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांनाही नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चोबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
प्रमोद चिंतामणी असे निलंबित करण्यात आलेल्या फौजदाराचे नाव आहे. तर, वरिष्ठ निरीक्षक संदीप सावंत यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तब्बल चार कोटी रुपयांच्या फसवणुकीचा एक महत्त्वाचा गुन्हा तपासासाठी होता. या प्रकरणात चौकशीदरम्यान संबंधित आरोपीच्या वकिलाकडे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांनी आरोपीला मदत करण्याच्या मोबदल्यात लाच दोन कोटींची लाच मागितली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीच्या वकिलाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल केली. त्यानुसार, एसीबीच्या पथकाने पुणे येथे सापळा रचत कारवाई करत चिंतामणी यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातून ४६ लाख ५० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, लाचलुचपत विभागाने चिंतामणी यांच्या घराची झडती घेतली असता त्यांना ५१ लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने देखील मिळून आले आहेत. पुढील तपास लाचलुचपत विभाग करत आहे.