पुणे जिल्ह्यातील २६ हजारांहून अधिक स्वयं सहाय्यता समूहांची ‘लोकोश ॲप’वर डिजिटल नोंदणी पूर्ण
पुणे, दि. १७:
पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्थापन करण्यात आलेल्या स्वयं सहाय्यता समूहांची ‘लोकोश ॲप’वर नोंदणी अनिवार्य करण्यात आली असून, आतापर्यंत एकूण २६ हजार ६१० समूहांची डिजिटल नोंदणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘माझे अस्तित्व’ योजनेअंतर्गत नव्याने तयार होणाऱ्या महिला बचत गटांची नोंदणीही ‘लोकोश ॲप’वर करण्याची प्रक्रिया सर्व तालुक्यांमध्ये सुरू आहे. या डिजिटल प्रणालीमुळे समूहांची अचूक माहिती संकलित होत असून, आवश्यक माहिती भविष्यात सहज उपलब्ध होण्यास मदत होते.
याशिवाय शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिलांना वेळेत आणि सुलभपणे मिळण्यासाठी या ॲपचा मोठा फायदा होत आहे. नोंदणी करताना प्रत्येक समूहाला विशिष्ट ओळख क्रमांक दिला जात असल्याने एका योजनेचा लाभ दुबार मिळण्याची शक्यता टाळली जाते. तसेच, एखादी महिला वेगवेगळ्या गटांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत असल्यास तेही या प्रणालीमुळे रोखता येते.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वयं सहाय्यता समूहांची स्थापना केली जाते. या समूहांद्वारे महिलांचे सामाजिक संघटन, आर्थिक समावेशन आणि स्वावलंबनाला चालना दिली जाते. पुढे ग्राम संघ व प्रभाग संघाच्या माध्यमातून संस्थांची नोंदणी करून महिलांना विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जातो.
उमेद अभियानामुळे महिलांमध्ये बचत, स्वयंरोजगार, डिजिटल साक्षरता आणि आर्थिक शिस्त वाढीस लागली असून ग्रामीण भागात सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडत आहे.
या उपक्रमात सर्व पात्र महिलांनी सहभागी होऊन आपल्या बचत गटांना उमेद अभियानाचा विशिष्ट ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी केले आहे.