कांदिवलीत रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन; सामाजिक उपक्रमांना वेग
मुंबई | विशेष प्रतिनिधी (रूपाली बैसाणे)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने कांदिवली येथे नव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नृत्य स्पर्धा, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच बक्षीस वितरण सोहळा यांचा समावेश होता.
कार्यक्रमादरम्यान कांदिवली तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मनोज अशोक बैसाने यांची तालुका सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. या निवडीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, “मनोज बैसाने यांच्या रूपाने आम्हाला खंबीर नेतृत्व मिळाले” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
आपल्या भाषणात जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत “संविधान टिकेल तरच लोकशाही टिकेल” असे स्पष्ट केले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक प्रबोधन आणि शिक्षण यावरही त्यांनी भर दिला.
बंधारपाखडी परिसरातील नागरिकांना संबोधित करताना त्यांनी आश्वासन दिले की, “सामाजिक, सांस्कृतिक किंवा शैक्षणिक कोणतीही गरज भासल्यास जनसंपर्क कार्यालयामार्फत आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू.”
या कार्यक्रमाला श्री माऊली बंदर पाखाडी गृहनिर्माण (SRA) नियोजितचे सेक्रेटरी आयु. केवन डिलिमा तसेच श्रावस्ती बुद्ध विहार येथील सभासद आणि परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.