विधान परिषदेसाठी वंचितची तयारी
मुंबई, दि. ६ ऑक्टोबर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या २०२६ मधील निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने चार उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
नागपूर पदवीधर मतदारसंघातून मंगेश छत्रपती वानखेडे, पुणे पदवीधर मतदारसंघातून प्रा. सोमनाथ जनार्दन साळुंखे, पुणे शिक्षक मतदारसंघातून डॉ. आय.सी. शेख, तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून गाजी जाहोरेश यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिक्षक आणि पदवीधरांचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्याच्या उद्देशाने पक्षाने हे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. शिक्षकांचे प्रश्न, पदवीधरांच्या रोजगाराच्या संधी, शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांसह विविध विषयांवर ठाम भूमिका मांडण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचे सांगण्यात आले.
उमेदवारांच्या विजयासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.