शासनाची फसवणूक करून महिला मंडळाचा परवाना चालवणाऱ्या दुकानाचा परवाना रद्द.
पुणे शहरातील मार्केट यार्ड भागात शारदा महिला मंडळ च्या नावाने रास्त भाव दुकानाचा परवाना सुरू होता. सदर परवाना श्रीकृष्ण पांडुरंग ननावरे नावाची व्यक्ती कोणत्याही परवानगीशिवाय चालवत असल्याचे परिमंडळ अधिकारी श्री अमोल हाडे यांनी दि. 11 जून 2025 रोजी तपासणी केल्यावर आढळून आले. तसेच तपासणी दरम्यान श्री हाडे यांना सदर रास्त भाव दुकानात अनेक गंभीर दोष आढळून आले जसे की रास्त भाव दुकान शासन निर्धारित वेळेत बंद ठेवणे, महिला मंडळाचे दुकान इतर व्यक्तीने चालवणे, रास्त भाव दुकानात शासनाने नेमून दिलेले दप्तर न ठेवणे, रास्त भाव दुकानातील तराजू व वजने प्रमाणित नसणे, शिधापत्रिकाधारकांशी अरेराविपणे बोलने व धमकावणे तसेच तपासणी वेळी प्रत्यक्ष व पुस्तकी शिल्लक धान्यसाठा यात तफावत आढळून येणे असे दोष आढळल्याने सदर परवाना रद्द होणे बाबतचा प्रस्ताव अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे यांच्याकडे सादर केला होता. सदर प्रस्ताव सादर केल्यानंतर विनापरवानगी रास्त भाव दुकान चालवणारे श्री ननावरे यांनी परिमंडळ अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु अन्नधान्य वितरण अधिकारी व परिमंडळ अधिकारी हे कोणत्याही दबावाला न जुमानता शासन नियमानुसार कारवाई करणार आहेत हे लक्षात आल्यावर श्री ननावरे यांनी सोशल मीडियाचा आधार घेऊन अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून कारवाई टाळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला परंतु या सर्व प्रयत्नांना न जुमानता श्री प्रशांत खताळ अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे यांनी रास्त भाव दुकानदारास त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली व सुनावणी घेण्यात आली. तसेच शारदा महिला मंडळ सद्यस्थितीत अस्तित्वात आहे का याची धर्मादाय आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडून खातर जमा करण्यात आली. तसेच दुकानातील आढळून आलेल्या दोषांची खातर जमा केल्यानंतर शारदा महिला मंडळ रास्त भाव दुकान परवाना क्रमांक ह 31 कायमस्वरूपी रद्द करण्यात आला. तपासणी दरम्यान तफावत आढळून आलेल्या धान्याच्या दंडाची रक्कम रु 33666/- वसूल करणे बाबत आदेश दि. 21 जुलै 2025 रोजी निर्गमित करण्यात आला. तसेच अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे यांनी सर्व परिमंडळ कार्यालयातील सहकारी संस्था व महिला बचत गटामार्फत चालवण्यात येणाऱ्या दुकानांची खातर जमा करण्याची मोहीम हाती घेतली असून दिनांक 22 जुलै 2025 रोजी सर्व परिमंडळ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना तशा सूचना देण्यात आल्या.