सोलापूर शिक्षक पतसंस्थेच्या चेंबूर शाखेचे उदघाटन संपन्न

सोलापूर शिक्षक पतसंस्थेच्या चेंबूर शाखेचे उदघाटन संपन्न
मुंबई - सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्या. बाळे, सोलापूरच्या चेंबूर शाखेचे उदघाटन आज मुंबई बँकेचे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी महासंघाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी दरेकर यांनी शिक्षकांचा सहवास हा आमच्यासाठी प्रेरणादायी असून संस्थेच्या उत्कर्षासाठी जी मदत लागेल ती निश्चितपणे करू, असे प्रतिपादन केले. 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विभाग मतदार संघाचे आ. दत्तात्रय सावंत हे होते. यावेळी नाशिक शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर दराडे, मुंबई शिक्षक मतदार संघाचे आमदार ज. मो. अभ्यंकर, अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार श्रीकांत देशपांडे, कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील, सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब काटकर,  उपाध्यक्ष शिवाजी थिटे यांसह संचालक मंडळ आणि शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

 
यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, शिक्षक हे शिक्षणदानाचे काम करतात. त्यामुळे विद्यार्थी घडतात व समाजाला चांगल्या पद्धतीने दिशा देण्याचे काम भविष्यात आपण पेरलेल्या विचारांवर होत असते. सहकार हा राज्यात जगला पाहिजे, टिकला पाहिजे एवढ्या साठीच आहे. सहकारात नेतृत्व करणारी माणसं तुमच्या जिवाभावाची असतात असे सांगत दरेकर यांनी गिरणी कामगार, माथाडी कामगार यांना घरांसाठी मुंबई बँकेमार्फत आर्थिक मदत केल्याचेही सांगितले. 

 
दरेकर पुढे म्हणाले कि, आम्ही स्वयं पुनर्विकास योजना मुंबईत आणली. या योजनेच्या माध्यमातून मुंबईत १८ इमारती उभ्या राहिल्या आहेत. विना विकासकाशिवाय सोसायट्यांनी इमारती उभ्या केल्या आहेत. आज १६०० प्रस्ताव आमच्याकडे आले असून ४६ जणांना कर्ज मंजूर केले आहे. आता स्वयं पुनर्विकास प्राधिकरण झाले असून त्याच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. मुंबई आता स्वयं पुनर्विकास योजना जोरात राबवू. तसेच लाडक्या बहिणींना सरकारने १५०० रुपये दिले. परंतु शून्य टक्के व्याजदराने व्यवसायासाठी एक लाखापर्यंत कर्ज मुंबई बँकेने दिले. हे धाडस केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने करतोय.  महिलांचे दीड हजार केवळ खर्च होण्यापेक्षा ते उद्योग व्यवसायात आले तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व महिला ताकदवान होणार असे नाविन्यपूर्ण प्रयोग करतोय आणि त्यात यशस्वी होऊ असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला. 

 
दरेकर पुढे म्हणाले कि, पतसंस्था ही पटकन मदत करणारी संस्था असते. शिक्षकांच्या पतपेढीला कितीही आर्थिक मदत लागली तरी ती करणार. संपूर्ण महाराष्ट्रभरात आपल्या पतपेढीचा विस्तार करा. शिक्षकांच्या आयुष्यात चांगल्या प्रकारचा उत्कर्ष होईल याची काळजी घ्या. संस्था उत्तमपणे चालवा. संस्थेच्या उत्कर्षासाठी जी मदत लागेल ती नक्की करू, असा दृढ विश्वासही दरेकरांनी यावेळी व्यक्त केला. 
 
शिक्षकांना समाधान देण्यासाठी जिथे जिथे
 
खारीचा वाटा उचलावा लागेल तिथे सोबत असू
 
दरेकर म्हणाले कि, शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे. चांगले शिक्षण झाले तर चांगले विद्यार्थी घडतील. देशाचे चांगले नागरिक घडले तर आपल्या समाजाला, विकासाला दिशा देण्याचे काम होऊ शकते. त्यासाठी शिक्षक समाधानी असला पाहिजे. शिक्षकच जर असंतुष्ट असेल तर तो विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारे समाधानाने शिकविणार. त्यामुळे तुमच्या आयुष्यात समाधान देण्यासाठी जिथे जिथे खारीचा वाटा उचलावा लागेल तिथे तुमच्यासोबत असू. 
 
00000