पनवेल महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘सैनिक हो तुमच्यासाठी…’ देशभक्तीपर गीतांचा भव्य स्वरसोहळा

पनवेल महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त  ‘सैनिक हो तुमच्यासाठी…’ देशभक्तीपर गीतांचा भव्य स्वरसोहळा
पनवेल,दि.२५: पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन तसेच ‘‘घर घर संविधान’ या अभियानांतर्गत ‘सैनिक हो तुमच्यासाठी… देशप्रेमाचा स्वरसोहळा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. 

 
भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देवकी मीडिया यांच्या प्रस्तुतिकरणाखाली या भव्य देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या देशभक्तीपर कार्यक्रमात सुप्रसिद्ध निवेदक विनीत देव सूत्रसंचालन करणार असून, सुप्रसिद्ध गायक-गायिका रुपाली वराडकर, सतीश भानुशाली, कोमल तेंडुलकर आणि संतोष पाटील हे कलाकार देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणातून प्रेक्षकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागवणार आहेत. 
 
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून पूर्णतः विनामूल्य आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या देशभक्तीपर स्वरसोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.