हिंगोली जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी सातत्य ठेवावे – मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले

हिंगोली, दि. 24 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींच्या प्रतिनिधींनी टीबीमुक्त ग्राम पंचायती ठेवत, जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी प्रयत्नात सातत्य ठेवण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी उपस्थितांना केले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या हस्ते क्षयरोगमुक्त ग्राम पंचायत अभियानांतर्गत टीबीमुक्त ग्राम पंचायतींना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी श्रीमती भोसले बोलत होत्या.
यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. संदीप काळे, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. राजेश्वर कत्रूवार, डॉ. गारोळे, डॉ बालाजी भाकरे, आयएमएचे सचिव डॉ. राम मुंढे उपस्थित होते.
आगामी काळात हिंगोली टीबीमुक्त जिल्हा म्हणून घोषित झाला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करुन जास्तीत जास्त संशयीत क्षयरुग्ण शोधून तपासणी करावी व या आजाराचे तात्काळ निदान करावे. त्यासाठी जिल्हा क्षयरोग केंद्रामार्फत मोफत धुंकी तपासणी तसेच एक्सरे तपासणी केली जाते याचा जास्तीत-जास्त नागरिकांना फायदा होईल. त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग निर्मूलन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच जिल्हा टीबीमुक्त होण्याकडे आपल्याला वाटचाल करता येईल, असे सांगितले. टीबीमुक्त ग्राम पंचायत प्रभावी करण्यासाठी गाव पातळीपर्यंत प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांनी केले.
यावेळी रौप्य पदक प्राप्त औंढा तालुका 6, वसमत तालुका 9, हिंगोली तालुका 4, कळमनुरी तालुका 5, सेनगाव तालुका 10 अशा एकूण 34 ग्राम पंचायतींना रौप्य पदक व प्रमाणपत्र देऊन सरपंच, आशा, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांना सन्मानीत करण्यात आले. याच कार्यक्रमात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणारी आरोग्य संस्था म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड व प्रा. आ. केंद्र आखाडा बाळापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश कत्रूवार यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कार्य करणारे समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बालाजी उबाळे यांनी केले. शासकीय परिचर्या महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमासाठी जिल्हा क्षयरोग केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत पोर्टेबल एक्सरे मशीनचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.