कृषी विज्ञान केंद्रानी शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करावे -सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

कृषी विज्ञान केंद्रानी शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करावे -सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

हिंगोली(जिमाका), दि. 6 : तोंडापूर कृषी विज्ञान केंद्रानी शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी विषमुक्त अन्न, नैसर्गिक शेती, दुग्ध व्यवसाय यासह विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने कार्य करावेत, असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. 
कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्राला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट देऊन तेथील संशोधन व विस्तार कार्याची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार शिवाजीराव माने, कयाधू शेतकरी उत्पादक कंपनीचे शेतकरी महेंद्र माने, नागनाथ सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप गंभीरे-पाटील उपस्थित होते. 
यावेळी बोलताना सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले, कठोर मेहनतीतूनच कृषी विकास शक्य आहे. विषमुक्त अन्न उत्पादन ही काळाची गरज आहे. नैसर्गिक शेतीसाठी युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. दुग्ध व्यवसाय व मिश्र शेती ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची बळकटीची साधने आहेत, असे सांगून कृषी विज्ञान केंद्रांचे कार्य हे वास्तवात परिवर्तन घडवणारे असल्याचे सांगितले.
    यावेळी माजी खासदार शिवाजीराव माने, महेंद्र माने, प्रदीप गंभीरे-पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरचे सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, कृषी महाविद्यालय तोंडापूरचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनीही सहभाग घेतला. ही भेट केवळ एक औपचारिक भेट न राहता, ग्रामीण भागात कृषी आणि सहकार क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करणारा एक प्रेरणादायी क्षण ठरला आहे.