नागरिकांनी लाभ घेण्याचे आयुक्तांचे आवाहन
पनवेल, दि.२८ : "स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल, हरित पनवेल" या संकल्पनेखाली पनवेल महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या विविध उद्यान केंद्रांवरून नागरिकांना मोफत देशी वृक्षांचे रोपे उपलब्ध करून दिली जात आहेत. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी केली आहे.
बदलत्या हवामानाचा परिणाम कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनूसार पनवेल महानगरपालिकेने व्यापक वृक्षारोपण मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील विविध ठिकाणी एक लाखाहून अधिक झाडे लावण्याचा निर्धार केला आहे. याची सुरूवात पर्यावरण दिनानिमित्ताने महापालिकेच्या चारही प्रभागात 1100 झाडांचे रोपण करून करण्यात आली आहे.
तसेच मागील महिन्यात अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित वृक्ष लागवड समिती स्थापन करण्यात आली आहे. याबरोबरच महापालिकेच्या या व्यापक वृक्षारोपण मोहिमेत पनवेलकरांनी सहभागी व्हावे याकरिता महापालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालये, एनएसएस विभाग शिक्षक ,पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनीधींची नियोजन बैठक अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती.
त्यानूसार विविध शाळा, महाविद्यालये, एनएसएस विभाग ,पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था व स्वयंसेवी संस्थांनी ,नागरिकांनी महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी महापालिकेच्या विविध प्रभागातील उद्यान पर्यवेक्षकांशी संपर्क साधून रोपे घेण्याचे आवाहन उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांनी महापालिकेच्यावतीने केले आले आहे.
पनवेल महानगरपालिका – स्वच्छतेशी कटिबद्धता राखत हरित उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धनासाठी पुढे सरसावली आहे. "चला पनवेल हरित करूया, निसर्गाला वाचवूया" असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.