ॠषिकेश ते रामेश्वरम गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात उत्साहात स्वागत

ॠषिकेश ते रामेश्वरम गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात उत्साहात स्वागत
महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने आयोजन ; गोप्रेमींची मोठया संख्येने उपस्थिती 
 
पुणे:  गौमाता की जय... भारत माता की जय... अशा घोषणा देत वंदे गौमातरम - गौ आधारित भारताच्या पुनर्निमाणाच्या दिशेने ६१ दिवसांच्या ऐतिहासिक गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात आगमन झाले. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने औंध येथील गोसेवा आयोग कार्यालयाच्या प्रांगणात या यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ही यात्रा देशभरातील १२ राज्यांतून प्रवास करत एकूण १०,१२७ किलोमीटर अंतर कापणार आहे.
 
यात्रेचे नेतृत्व भारतीय वेटर्नरी अ‍ँड अ‍ॅग्री रिसर्च इन्स्टिट्यूट अध्यक्ष व डेअरी अ‍ॅग्री कन्सल्टंट भारतसिंह राजपुरोहित आणि राष्ट्रीय गौ सेवक संघाचे संस्थापक नरेंद्र कुमार हे करीत आहेत. सदर यात्रेमध्ये राष्ट्रीय गो सेवक संघ अध्यक्ष रोहित कुमार बिष्ट  हे सुद्धा सक्रियपणे सहभागी होते. 

 
यात्रा स्वागत प्रसंगी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, सदस्य संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय, सदस्य सचिव डॉ मंजुषा पुंडलिक, अधिकारी डॉ संगीता केंडे, डॉ आशिष पवार आणि आयोगाचा सर्व कर्मचारी वृंद हजर होता. स्वागत समारंभाला पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयातील  सहायुक्त मुख्यालय डॉ. श्यामकांत पाटील, उपायुक्त पुणे डॉ. परिहार आदी उपस्थित होते. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या सभागृहात पुणेरी पगडी, शाल देऊन गौ राष्ट्र यात्रेच्या आयोजकांचा सन्मान करण्यात आला.

 
भारतसिंह राजपुरोहित म्हणाले, गायीचा विषय सरकारने समाजावर सोडला अहे. त्यामुळे समाजाला देखील याविषयामध्ये सशक्त व्हायला हवे. गाय हे प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचे प्रतिक बनेल, असा प्रयत्न आपल्याला करायला हवा. महाराष्ट्रात गोमातेला राज्यमाता म्हणून घोषित करण्यात आले. सर्वच राज्यात अशा प्रकारे गोमातेला राज्यमातेचा दर्जा द्यायला हवा. तब्बल ४२ दिवस आम्ही यात्रेत आहोत. यापुढेही ही यात्रा अशीच सुरु राहणार असून गोबर क्रांती आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनजागृती आणि संवादातून गाय हे प्रतिष्ठेचे प्रतिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. राजपुरोहित यांनी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अल्पावधीत केलेल्या भरीव कामाचे कौतुक केले.
 
महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा म्हणाले, देशी गोवंशाचे संगोपन आणि संवर्धन व्हावे, तसेच गोआधारित शेती केली जावी, याविषयावर जनजागृतीपर ही यात्रा पुण्यात आली आहे. गाय वाचली तरच देश वाचेल. आपण तीन मातांना मानतो. त्यामध्ये सर्वप्रथम आपली आई म्हणजेच माता, मायभूमी म्हणजेच भारतमाता आणि गोमाता. त्यामुळे सर्वांचे कर्तव्य आहे की गोमातेचे रक्षण आणि संवर्धन करायला हवे. गोमातेला राष्ट्र मातेचा दर्जा देखील मिळायला हवा, असेही त्यांनी सांगितले. नरेंद्र कुमार, संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय यांनी मनोगत व्यक्त केले.
 
 फोटो ओळ : गौमाता की जय... भारत माता की जय... अशा घोषणा देत वंदे गौमातरम - गौ आधारित भारताच्या पुनर्निमाणाच्या दिशेने ६१ दिवसांच्या ऐतिहासिक गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात आगमन झाले. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने औंध येथील गोसेवा आयोग कार्यालयाच्या प्रांगणात या यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ही यात्रा देशभरातील १२ राज्यांतून प्रवास करत एकूण १०,१२७ किलोमीटर अंतर कापणार आहे.