इचलकरंजी ते कुंभोज बससेवा सुरू; प्रवाशांना दिलासा
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिका परिवहन मंडळाच्या वतीने इचलकरंजी ते बाहुबली मार्गे कुंभोज या नवीन बससेवेचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी परिवहन समिती सभापती अरुणा प्रमोद बचाटे आणि कुंभोज ग्रामस्थांच्या उपस्थितीत बसचे पूजन करून हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
बससेवेच्या शुभारंभानंतर आमदार डॉ. राहुल आवाडे, परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे आणि नगरसेवकांनी स्वतः बसमधून प्रवास करून सेवेचा प्रारंभ केला.
या नवीन बससेवेमुळे कुंभोज परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला दैनंदिन प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच बाहुबली हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही या बससेवेचा लाभ मिळणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांची प्रवासाची गैरसोय दूर करून सार्वजनिक वाहतुकीचे जाळे अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. ही बससेवा कायमस्वरूपी सुरू राहील, अशी ग्वाही आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमास नगरसेवक संतोष शेळके, संग्राम स्वामी, अभिषेक वाळवेकर, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रमोद बाळासाहेब बचाटे, कुंभोजचे प्रभारी सरपंच अनिकेत चौगुले, जवाहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासो चौगुले, महापालिकेचे अधिकारी विजय राजापुरे, राज शेख, ओंकार माळी, कुंभोज ग्रामस्थ आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.