इमारती, रस्ते व पुलाची कामे गुणवत्तापूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे

इमारती, रस्ते व पुलाची कामे गुणवत्तापूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे
हिंगोली(जिमाका), दि. 09 : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नांदेड प्रादेशिक विभागांतर्गत नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या इमारत बांधकाम, रस्ते व पुलाच्या बांधकामाची सर्व कामे गुणवत्तापूर्ण होतील याची काळजी घ्यावी. बांधकामाचा दर्जा आणि गुणवत्ता याला प्राधान्य द्यावे, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिल्या. शासकीय विश्रामगृह येथे  झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रादेशिक आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आमदार तानाजी  मुटकुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंके, मुख्य अभियंता श्रीनिवास कातकडे, अधीक्षक अभियंता सलीम शेख, हिंगोलीचे कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे यांच्यासह नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंता, उपअभियंता आदी यावेळी उपस्थित होते.

नांदेड प्रादेशिक विभागातील सर्व जिल्ह्यातील विविध भागातील रस्ते, इमारतींची काम विहीत कालावधीत पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करावे. या कामांना अभियंत्यांनी भेटी देवून कामांचा दर्जा तपासावा. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारे प्रत्येक काम दर्जेदार होईल, याची दक्षता घ्यावी. रस्त्यांच्या बाजूला, इमारत परिसरात वृक्षारोपण करताना स्थानिक प्रजातींच्या, विशेषतः अधिक प्रमाणात सावली देणाऱ्या वृक्ष लागवडीला प्राधान्य द्यावे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यावेळी म्हणाले. तसेच कार्यालयीन स्वच्छता, आधुनिक तंत्रज्ञानाचा कामकाजात वापर आदी बाबींकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांचीही माहिती यावेळी मंत्री श्री.भोसले यांनी घेतली. तसेच आमदार मुटकुळे यांच्या प्रस्तावित कामाचा समावेश करुन मान्यतेसाठी सादर करावेत, अशा सूचना केल्या.   
यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा व प्रस्तावित कामांना मान्यता द्यावी, अशी मागणी बैठकीत केली. 
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कातकडे यांनी नांदेड प्रादेशिक विभागातील सर्व जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्ते, पूल व इमारत बांधकामांची माहिती दिली. तसेच कामे दर्जेदार करण्यासाठी सध्या अस्त्विात असलेल्या शासन निर्णयात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यासोबतच  रस्त्यांवरील खड्डे बुजविणे व इतर दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.