हिंगोली (जिमाका), दि. 09 : हत्ता-साखरा-तळणी-सिंदगी या राज्य रस्त्याचे काम कमी वेळात पूर्ण करण्यात येणार असून हा रस्ता दर्जेदार होणार आहे. दर्जेदार रस्त्यामुळे कमी वेळात वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे येथे उत्पादित दूध, भाजीपाला, यासह इतर कृषी उत्पादनांना अधिकचा दर व उत्पादकाकडून ग्राहक, उपभोक्त्याला ताजा माल मिळण्याची सोय होणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज हत्ता येथील कार्यक्रमात केले.
सेनगाव तालुक्यातील हत्ता येथे आज हत्ता-साखरा-तळणी-सिंदगी या राज्य रस्त्याचे भूमीपूजन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते आज कोनशिलेचे अनावरण करुन करण्यात आले. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, माजी आमदार रामराव वडकुते, माजी आमदार गजानन घुगे उपस्थित होते.
पुढे बोलतांना प्रा. शिंदे म्हणाले, या राज्यमार्गामुळे हत्ता - साखरा - तळणी - सिंदगी गावांच्या मूलभूत विकासासाठी रस्त्याचे बांधकाम हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे येथील दळणवळणाच्या सोयीसुविधांमध्ये वाढ होत असून, या रस्ता बांधकामामुळे गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण बदल घडून येणार आहे. हिंगोली - सेनगाव - रिसोड तसेच जिंतूर सेनगाव -रिसोड अशा पद्धतीने मराठवाडा विदर्भाला नव्या मार्गाने जोडले जाणार आहेत. छोटी गावे शहरांना आणि इतर गावांशी जोडल्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, असेही प्रा. शिंदे यांनी सांगितले. या रस्त्यामुळे स्थानिक पातळीवरच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. बहुमतात असलेले सरकार असल्यामुळे गोरगरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय कोणत्याही योजनांपासून वंचित राहणार नाहीत, अशी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीचे 100 दिवस कृती आराखडा अंमलबजावणी कार्यक्रम प्रत्येक विभागाकडून राबविण्याचे निर्देश दिले असून, त्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे सांगून जलसंधारण मंत्री असताना बंधारे बांधून जलसंधारणाचा अनुशेष भरून काढण्याचे काम केले असल्याचे सांगितले. यापुढेही हिंगोली जिल्ह्याचा उर्वरित अनुशेषही भरून काढण्यात येईल, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण, प्रधानमंत्री सौरघर योजनी, कृषी वीज बील शुन्य आदी राज्य शासनाच्या योजनांची माहिती विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.
शेतकऱ्यांप्रती तळमळ असणारे, सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, यासाठी झटणारे आमदार तान्हाजी मुटकुळे हे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनामध्ये सन्मान निर्माण केल्याचे काम केले असल्याचे सांगून जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक त्या सुखसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडण्याचे काम करण्यात येईल, असे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवजेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींच्या सर्व लोकांना सोबत घेत स्वराज्य स्थापनेसाठी प्रयत्न केले. त्यामुळे मराठी माणूस म्हणून आपण सर्व एक आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर या दोघांनीही त्यांच्या राजवटीत जनतेच्या कामाला प्राधान्य दिले. त्याचप्रमाणे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आपण दोघेही या रस्ता भूमिपूजनाचे काम करत आहोत. या रस्त्यामुळे ग्रामीण भागात वाहतूक सुलभ होणार आहे. व्यापार आणि वाणिज्य वाढविण्यासाठी, आरोग्य सेवा आणि आपत्कालीन सेवा मिळविण्याच्या कालावधीत बचत होते. या राज्य मार्गामुळे गावाच्या विकासात आणि ग्रामीण जीवन सुधारण्यासाठी मोठे योगदान मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
या रस्ता कामाचा दर्जा उच्च राहील, त्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. मंत्री म्हणून मंत्रालयात न थांबता राज्यात फिरून जनतेची कामे करण्यात येतील. तसेच मुबलक प्रमाणात आवश्यक तेवढा निधी पुरवठा केला जाईल. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी, पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांच्या दळणवळणाच्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामासाठी 100 टक्के निधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. या भागातील पाणीप्रश्नही सोडविण्यात येतील. आपल्या हक्काचे असलेले पाणी मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगून केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील हे राज्य शासन तितक्याच ताकदीने काम करत आहे, असेही छत्रपती भोसले यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार तानाजी मुटकुळे म्हणाले की, या महत्त्वपूर्ण रस्ता कामाचे भूमिपूजन झाले असून, हिंगोली जिल्ह्यातील सुवर्णाक्षरात लिहण्यासारखा क्षण आहे. या भूमीपूजन कार्यक्रमास दोन राजघराण्यातील वंशज येथे आले आहेत. महाराष्ट्र हिताचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील नरसी नामदेवपासून विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काम होणे आवश्यक आहे, असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
माजी आमदार रामराव वडकुते यांनी 200 कोटी रस्ते भूमिपूजनाच्या निमित्ताने दोन राजे आले आहेत. दोघांचेही स्वागत करुन त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले. तसेच हत्ता ते औंढा नागनाथ रस्त्यापर्यंतचे 40 किलोमीटरच्या कामास मंजुरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
या कार्यक्रमास परिसरातील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.