कुदळवाडीत गोडाऊनचे पत्रे काढताना कामगाराचा पडून मृत्यू...

पिंपरी :-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाई दरम्यान गोडाऊनचे पत्रे स्वतःहून काढत असताना उंचावरून पडून एका कामगाराचा सोमवारी (दि.१०) दुपारी मृत्यू झाला. दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेने अतिक्रमण कारवाई सुरू केली असून या कारवाईचाच हा बळी असल्याचा आरोप आता व्यावसायिक करीत आहेत.
अवदेश रामप्यारेप्रसाद यादव (५२, कुदळवाडी, मूळ रा. उत्तरप्रदेश) असं मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. कुदळवाडी मधील अक्रम मोहम्मद अली चौधरी यांच्या मालकीचे श्रीराम गोडाऊनमध्ये यादव काम करीत होते. महानगरपालिकेची कारवाई सुरू असल्याने नुकसान टाळण्यासाठी काही व्यावसायिक कामगारांच्या मदतीने जेवढे शक्य आहेत तेवढे बांधकाम स्वतःहून काढून घेत आहेत.
श्रीराम गोडाऊनवर पत्रे लावण्यात आले होते. या पत्र्यांमध्ये एक पत्रा उजेडा करीत प्लास्टिकचा लावण्यात आला होता. यादव हे पत्रे काढण्यासाठी छतावर चढले होते. पत्र्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडाली होती. त्यामुळे अन्य पत्र्यांप्रमाणे हा देखील दणकट पत्रा असल्याचे समजून यादव त्याच्यावर गेले आणि तो पत्रा तुटला. यादव थेट वीस फूट खाली डोक्यावर पडले. डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे, यादव यांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.