चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांच्या अडचणी सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य
मुंबई, १६ ऑगस्ट
चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे आणि पायाभूत सुविधांच्या समस्या सोडविण्यास प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पावसाळ्यात रस्ते दुरुस्ती करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन प्री कास्ट तसेच जिओ पॉलिमर टेक्नो पॅचसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या विविध अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. अमोल कोल्हे, विधान परिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार बाबाजी काळे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पीएमआरडीएचे आयुक्त अभिजित चौधरी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजक उपस्थित होते.
चाकण तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १४ विभागांचे अधिकारी एकत्रितपणे काम करतील. दर शुक्रवारी या सर्व विभागांची बैठक घेऊन कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
औद्योगिक क्षेत्रातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा प्रशासनाने आढावा घ्यावा आणि कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, असेही निर्देश देण्यात आले. रस्ते, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, पाणी आणि वीज या परस्परांशी संबंधित सुविधांचा सर्वसमावेशक आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
चाकण शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांच्या कडेला पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक त्या ठिकाणी नवीन अंतर्गत रस्ते, पर्यायी मार्ग आणि उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चाकण शहराच्या विकास आराखड्याला लवकरच मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
वीजेची समस्या सोडविण्यासाठी महापारेषणकडून ३१ ऑगस्टपर्यंत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नवीन विद्युत उपकेंद्रासाठी एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्र आणि रुग्णालयांसाठीही एमआयडीसी जागा उपलब्ध करून देणार आहे.
छत्रपती संभाजीनगर, रांजणगाव आणि चाकण एमआयडीसीला जोडणारा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर तसेच उरण, कर्जत, राजगुरुनगर, शिरूर आणि पुणे यांना जोडणाऱ्या नवीन महामार्गामुळे चाकण परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. उद्योजक आणि स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडी, खड्डे आणि इतर पायाभूत सुविधांच्या समस्यांपासून दिलासा देण्यासाठी अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.