गटबाजी संपवून एकसंघ रिपब्लिकन पक्ष उभा करा — रामदास आठवले

गटबाजी संपवून एकसंघ रिपब्लिकन पक्ष उभा करा — रामदास आठवले

मुंबई, दि. 23 : देशभरात रिपब्लिकन पक्ष एकसंघ आणि मजबूत करण्यासाठी गटबाजी थांबवून सर्वांनी एकाच पक्षात एकत्र यावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रकाश खंडागळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात जाहीर प्रवेश केल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशभर पोहोचविण्याचा प्रयत्न आपण केला असून, 28 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये पक्षाचा विस्तार झाला आहे. महाराष्ट्रात मात्र अनेक गट असल्याने पक्षाची ताकद कमी होत असल्याचे आठवले यांनी सांगितले.

“नवे गट स्थापन करण्यापेक्षा विद्यमान छोटे-मोठे गट विसर्जित करून एकसंघ रिपब्लिकन पक्ष उभा करणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या आवाहनाला राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यापूर्वी महाराष्ट्र पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मिलिंद सुर्वे यांनीही आपला गट विलीन करून पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रकाश खंडागळे यांनी सांगितले की, “वेगळे गट निर्माण करून गटबाजी वाढवण्यापेक्षा रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकसंघ पक्ष मजबूत करणे आवश्यक आहे,” आणि त्यानुसार त्यांनी अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला.

यावेळी पक्षातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.