‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला विरोध म्हणजे महिलांच्या प्रगतीला अडथळा — डॉ. हिना गावित
Ks news प्रतिनिधी रुपाली बैसाणे
धुळे : ‘नारी शक्ती वंदन’ या विधेयकाला विरोध करून विरोधकांनी महिलांच्या प्रगतीत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी जोरदार टीका भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी केली.
धुळे शहरातील भाजप जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात ‘नारी शक्ती वंदन विधेयक 2026’ या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी डॉ. गावित यांनी विधेयकाच्या तांत्रिक व धोरणात्मक बाबींचा सविस्तर आढावा घेत, महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी हे विधेयक अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. महिलांना राजकीय मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.
विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी सांगितले की, अनेक वर्षे सत्तेत राहूनही महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले न उचलणारे काँग्रेस व महाविकास आघाडीतील पक्ष आज महिलांच्या नावाखाली केवळ राजकारण करत आहेत. या विधेयकाला विरोध करून त्यांनी महिलांच्या प्रगतीला रोखण्याचा प्रयत्न केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपने नेहमीच महिला सशक्तीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले असून, भविष्यातही महिलांना न्याय व संधी मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.