जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम यशस्वीपणे राबवा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम यशस्वीपणे राबवा -  जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
 जिल्हा समन्वय समितीची सभा संपन्न
 
हिंगोली, (जिमाका) दि. 19:  शासनाच्या आरोग्य विभागामार्फत कुष्ठरोग प्रसार शून्यावर आणण्यासाठी १७ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबरदरम्यान कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. 
 
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. राहुल गीते, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश पवार, शिक्षणाधिकारी आशावरी काळे, सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. शिवाजी गीते, पथकप्रमुख अधिकारी डॉ. सुनिल देशमुख यांची उपस्थित होती.

 
 जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग शोध मोहीम १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या १४ दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येत आहे. तेव्हा नागरिकांनी कुष्ठरोग सर्वेक्षण पथकाला सहकार्य करून स्वतःहून पुढे येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. आरोग्य, महिला व बालकल्याण, शिक्षण व समाज कल्याण या विभागांनी समन्वय राखून अभियान यशस्वी राबवावे, अशा सूचना बैठकीत दिल्या. शहरी भागामध्ये विशेष लक्ष देऊन सर्वेक्षण करावे, त्याचबरोबर या अभियानात राष्ट्रीय बालआरोग्य कार्यक्रम (आर. बी. एस.के.) टीममार्फत शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

 
राज्याने सन २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय निश्चित केले आहे. या ध्येयाच्या अनुषंगाने, कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नवीन कुष्ठरोग शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून अभियानात समाजातील निदान न झालेले कुष्ठरोग लवकरात लवकर शोधून काढणे. नवीन सांसर्गिक कुष्ठरोग शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करणे आणि त्यामुळे होणारा प्रसार कमी करणे. समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे. या अभियानात  घरोघरी जाऊन टीममार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे  सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. राहुल गीते यांनी प्रास्तावित करताना सांगितले.
 
 या अभियानात जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील 1135 सर्वेक्षण टीम मार्फत एकूण 11 लाख 23 हजार 836 लोकसंख्येचे सर्वेक्षण करुन एकूण 723 गावामध्ये सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे.
 
यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे, सहाय्यक जिल्हा माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, महिला बाल कल्याण विभागाचे जी. जी. कापसे, डॉ. छाया कोल्हाळ, डॉ. बालाजी भाकरे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी मारोतराव पोले, मंचक पवार, चंद्रकांत पाटील, अमोल कुलकर्णी, अझर अली, शेख मुनाफ, वैजनाथ देशमुख, केशव डासरे आदी उपस्थित होते.
***